चार लाखांहून अधिक मते नोटाला

सत्तेचा गैर वापर करून केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिल्या गेलेल्या धमक्या, पक्षाची पह्डापह्ड, पक्ष चिन्ह आणि उमेदवारांची पळवापळवी, निवडणूक प्रचारात खालच्या पातळीवर झालेले आरोप-प्रत्यारोप यामुळे मतदारांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. मतदारांनी ही नाराजी लोकसभा निवडणुकीतील मतदानात ईव्हीएम मशीनवरील ‘नोटा’चा पर्याय स्वीकारत व्यक्त केली असून यंदाच्या निवडणुकीत राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांतील 4 लाख 15 हजारांहून अधिक मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

महाराष्ट्रातील 9 कोटी 29 लाख 43 हजार 890 मतदारांपैकी 5 कोटी 70 लाख 6 हजार 778 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी सुमारे 4 लाख 15 हजार 580 उमेदवारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 0.72 टक्के मतदारांनी नोटाच्या पर्यायाचा उपयोग केला. तर 2019मधील लोकसभा निवडणुकीत 4 लाख 88 हजार 766 मतदारांनी म्हणजे सुमारे 0.91 टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला होता. त्यापूर्वीच्या निवडणुकीत म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीत 4 लाख 33 हजार 171 मतदारांनी म्हणजे 0.89 टक्के मतदारांनी नोटाचे बटण दाबले होते. पण महाराष्ट्रातील मागील दहा वर्षांमधील लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा नोटाच्या पर्यायाचा वापर कमी झाला, असे निवडणूक कार्यालयातील अधिकाऱयाने ही आकडेवारी मांडत स्पष्ट केले. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर रिंगणात होते. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला. आता या मतदारसंघातील लढाई कोर्टात होण्याची चिन्हे आहेत. पण या मतदारसंघात सुमारे 15 हजार 161 मते नोटाला पडली. तर धुळ्यात भाजपच्या सुभाष भामरे यांचा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी सुमारे 3 हजार 831 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात 4 हजार 693 मते नोटाला पडली.

2013पासून नोटाचा पर्याय

एखाद्या मतदाराला निवडणूक रिंगणातील कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर नोटाचा पर्यात ईव्हीएम मशीनवर देण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत डिसेंबर 2013ला आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध झाला.

मतदारसंघ – नोटाची मते

मागील तीन लोकसभा मतदारसंघांतील मतांची आकडेवारी

वर्ष एकूण मतदार झालेले मतदान नोटा टक्केवारी

2024 9,29,43,890 5,70,06,778 4,15,580 0.72 टक्के

2019 8,86,76,964 5,35,65,479 4,88,766 0.91 टक्के

2014 8,08,51,094 4,86,69,154 4,33,171 0.89 टक्के

या लोकसभा मतदारसंघांत नोटाचा सर्वाधिक उपयोग

मतदारसंघ नोटाला पडलेली मते

 रायगड 27 हजार 270

l पालघर 23 हजार 385

 ठाणे 17 हजार 901

 मावळ 16 हजार 760

 गडचिरोली-चिमूर 16 हजार 577

नोटाचा सर्वात कमी वापर या मतदारसंघांत

मतदारसंघ नोटाला मिळालेली मते

 बीड 2 हजार 87

 अमरावती 2 हजार 544

 सोलापूर 2 हजार 725

 हिंगोली 3 हजार 123

 नगर 3 हजार 282

महामुंबईतील नोटाच्या मतांची आकडेवारी

 उत्तर पश्चिम मुंबई .. 15 हजार 161

 उत्तर मुंबई 13 हजार 346

 उत्तर मध्य मुंबई 9 हजार 749

 उत्तर पूर्व मुंबई 10 हजार 173

 दक्षिण मुंबई 13 हजार 141

 दक्षिण मध्य मुंबई.. 13 हजार 423

 ठाणे 17 हजार 901

 कल्याण 11 हजार 686