
खालापूरमधील नागरिकांनी ऑनलाइन जमा केलेल्या घरपट्टीच्या पावत्या परस्पर रद्द करून लाखो रुपयांची रक्कम हडप करण्यात आली आहे. लेखा परीक्षण अहवालात हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी नगरपंचायतीत घरपट्टी घोटाळा घडला होता. आता पुन्हा दुसऱ्यांदा असाच घोटाळा घडल्याने प्रशासनाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
खालापूर नगर पंचायत कार्यालय जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील दैनंदिन घरपट्टी भरणा चलन व घरपट्टी पावत्यांची रक्कम परस्पर हडप करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने तयार करण्यात आलेल्या पावत्या आणि रक्कम लेखापालांकडे जमा करण्यात आलेली नाही. हे काम करणाऱ्या नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे लॉग इन आयडी वापरून पावत्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेल्या पावत्यांबाबत कोणत्याही प्रकारची नोंद किंवा अहवाल आढळून आलेला नाही. मालमत्ताधारकाने नगरपंचायतीस भरलेली रक्कम दिवसअखेर लेखापाल, रोखपाल यांच्याकडे जमा न करता, पावती लॉग इन आयडीवरून रद्द केल्याचे लेखा परीक्षणात दिसून आले.
दोषींवर कारवाई करणार
हे प्रकरण गेल्या वर्षात घडलेले आहे. मी दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. घरपट्टी पावत्यांमध्ये झालेला घोळ उघडकीस आल्यानंतर तातडीने चौकशी सुरू केली आहे. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया खालापूर नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी व्यक्त केली आहे.
तोपर्यंत घरपट्टी भरू नका
खालापूर नगरपंचायतीमध्ये या आधीदेखील घरपट्टीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीत अवास्तव वाढ केल्यामुळे प्रशासनावर जनता नाराज आहे. त्यातच आता हा घरपट्टी घोटाळा उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वर्षभरात दुसऱ्यांदा झालेल्या या घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर गेली असून त्याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. या घोटाळ्याची चौकशी होईपर्यंत नागरिकांनी घरपट्टीचा भरणा करू नये, असे आवाहन अॅड. राकेश गव्हाणकर यांनी केले आहे.