क्लासिक – डेव्हिल लाईज इन दी डिटेल्स

>> सौरभ सद्योजात

‘घाबरणे हे जर दुःखदायक असेल तर त्यानंतर निर्माण होणारी भावस्थिती आनंद देऊन जाते. हा एक प्रकारचा आत्मपिडनातून निर्माण होणारा आनंदच होय. भीती दुःख देते; पण त्या भीतीचा निचरा झाल्यावर आनंद होतो.’

रत्नाकर मतकरींच्या ‘फाशी बखळ’ या गूढकथा संग्रहाच्या प्रस्तावनेत धों. वि. देशपांडे यांनी भयाच्या अवस्थेचं आणि त्यातून उत्पन्न होणाऱया इतर भावनांचं केलेलं हे चपखल वर्णन आहे. भयाच्या जवळ नेऊ पाहणारी साहित्यकृती सामान्यत: वाचकांच्या पसंपामात नसते हा मोठा गैरसमज आहे. हे साहित्य कमअस्सल असल्याचा अपप्रचार करत ते दाबण्याचाही प्रयत्न आपल्याकडे पूर्वी झाला, पण मतकरी सर, नारायण धारप आणि आताच्या काळात हृषीकेश गुप्ते यांचं लेखन आवडीने वाचणारे पुष्कळ वाचक आपल्याला दिसून येतात. पण हा लेखन प्रकार आपल्याकडे सखोल रुजण्यासाठी बराच काळ लोटावा लागला हे दुर्दैव म्हणावं लागेल. याबाबत इंग्रजी भाषाविश्व मोठ्या ढांगा टाकत पुढे सरकलेलं होतं. 1959 साली शर्ली जॅक्सनने लिहिलेल्या ‘दी हाँटिंग ऑफ हिल हाऊस’ची ढांगही अशीच ठसा उमटवून गेली. अतिंद्रिय आणि परामानसशास्त्रीय पद्धतीचं हे कथानक आजही आवडीने वाचलं जातं.

या कथानकाचा आजच्या परिप्रेक्ष्यात विचार केला तर कदाचित अनेकांना त्यातली गुंतागुंत फारशी खास वाटणार नाही. कारण अनेक प्रकारच्या कथा व सिनेमे यांनी भयाच्या दरवाजापाशी नेऊन सोडणाऱ्या अनेक अज्ञात रानवाटा आजवर दाखवल्या आहेत, पण या ग्रंथाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य चमकत राहतं ते म्हणजे यात येणारे तपशील. घराची विक्षिप्त रचना, खोल्यांच्या आत दडलेल्या खोल्या व त्यांना असणारे अनेक दरवाजे आणि भिंती व स्तंभांवर कोरलेल्या आकृती यांबाबतचं जॅक्सन यांनी केलेलं विश्लेषण हे कथानकात खोल ओढून घेतं. मूळ गावात राहणाऱया लोकांचं घराबाबत असलेलं नकारात्मक मत, घराची काळजी घेणाऱ्या जोडप्याचं अजब, पण स्पष्ट वर्तन यातून अगदी सुरुवातीलाच गूढतेचा आभास होऊ लागतो. लेखिका या वर्णनातून वास्तूबाबतचा अविश्वास आणि अज्ञात घटकांचा संभव अधोरेखित करते. डॉ. मोंटेग्यू यांना भीतीमुळे व्यक्तींच्या मानसिक अवस्थेत येणारा असमतोल अभ्यासण्यासाठी या घराची आणि अशा प्रकारच्या अनुभवातून गेलेल्या लोकांची गरज आहे. अर्थात ‘हिल हाऊस’ ही वास्तू आणि एलेनोर, थियोडोरा व ल्यूक या पात्रांच्या माध्यमातून या दोन्ही गरजा पूर्ण होतात. यातलं एलेनोर हे पात्र गुंतागुंतीचं आहे. आयुष्याची अनेक वर्षे आजारी आईच्या शुश्रूषेत, तर तिच्या पश्चात बहिणीच्या दबावाखाली राहिल्यामुळे वास्तव जगाशी असणारं तिचं नातं मर्यादित आणि कटू आहे आणि म्हणून तिला स्वप्नवत आयुष्याची ओढ आहे. त्यामुळे या प्रयोगाची जाहिरात पाहताच ती तिचा होकार कळवून टाकते. तिला वेगळ्या जागेतल्या वास्तव्याची, धाडसी आव्हानांची अतोनात गरज असल्याचं तिच्या संवादातून जाणवत राहतं. लेखिका शर्ली जॅक्सन यांच्या आयुष्यात हलकेच डोकावलं की लक्षात येतं, एलेनोर या पात्राच्या निर्मितीमागे खासगी आयुष्यातले धागेदोरे आहेत. दुःखद बालपण, अपयशी ठरलेलं लग्न आणि त्यातून उद्भवलेला Agoraphobia असं जगणं शर्ली यांच्या वाटय़ाला आल्याचं दिसतं. त्यामुळे अशा कष्टप्रद आयुष्याचं बिंब त्यांच्या लेखनात उतरलं आहे, असं खात्रीपूर्वक म्हणता येईल.

‘दि हाँटिंग ऑफ हिल हाऊस’ ही कादंबरी एखाद्या नाटकाच्या प्रवेशासारखी प्रस्तुत होते. कथानकातल्या पात्रांचा परिचय होतो आणि मग कथानक गती घेतं. गूढता, मानसिक असंतुलनातून येणारी प्रतिािढया आणि जागेचे तपशील हे या कादंबरीचे मूलाधार वाटतात. एलेनोर, जी उदासीन आणि दुःखी आयुष्यात खितपत पडलेली असते, तिला या घराच्या माध्यमातून तिच्या कल्पनेतलं जग उभं करण्याची संधी मिळते. अर्थात तिचा उत्साह टोकाला पोहोचतो आणि घातक ठरतो. ती वास्तवापासून दूर चालत भ्रमाच्या कवेत पोहोचते.

जॅक्सन यांनी अशा अवस्थेत मानवी स्वभावाची सहज, पण अप्रस्तुत वाटू शकणारी (प्रत्यक्षात अप्रस्तुत नसणारी!) प्रतिािढयाही यात मांडली आहे, ती म्हणजे एलेनोर आणि थियोडोरा यांच्यात निपजणारा समलैंगिक आकर्षणाचा तणाव, पण आकर्षणाचा हा भाव एलेनोर तिथल्या भयप्रद परिस्थितीला तोंड देण्यासाठी वापरत असते हे आपल्या लक्षात येतं.

शेक्सपिअरच्या `Journeys end in lovers meeting’ या ओळी ती घोकते ते याचसाठी. हे भलंथोरलं घर आणि एलेनोर, दोघेही अडगळीत पडल्याचा संकेत यात दिसून येतो. ‘Lack of sense of identity’ ची अडचण एलेनोरला छळते तशीच ती शर्ली यांना छळली असावी का? हा प्रश्नही पडतोच. दुःख, एकाकीपण आलेल्या व्यक्तीला ‘Absolute
Reality’ च्या कुशीत जगावं लागणं हाच मुळात एक शाप असतो. तोच शाप एलेनोरच्या माध्यमातून लेखिकेने जगला असेल काय? एवढाच प्रश्न अखेर सलत राहतो.

[email protected]
(लेखक इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत.)