कोरोना लॉकडाऊनमध्ये जमावबंदीचे उल्लंघन, आमदार सेल्वन यांच्यासह चौघांची निर्दोष सुटका

कोरोनाच्या लॉकडाऊनदरम्यान विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने जमावबंदी व इतर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्यात आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांच्यासह चौघांची निर्दोष सुटका झाली.

गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने कॅप्टन सेल्वन यांच्यासह गजानन पाटील, संतोष पांडे, सागर पिल्ले यांना सबळ पुराव्यांअभावी निर्दोषमुक्त केले. 6 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झेंडय़ावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. तथापि, या प्रकरणात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याच्या आरोपाबाबत सबळ पुरावे सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे, असे निरीक्षण दंडाधिकारी नदीम पटेल यांनी नोंदवले. तसेच याआधारे आमदार कॅप्टन सेल्वन यांच्यासह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.