कन्नडिगांनी काळं फासलेल्या एसटी चालकाचा शिवसेनेकडून सत्कार

कर्नाटक राज्याच्या सीमा भागात चित्रदुर्ग येथे करवेच्या गुंडांकडुन धक्काबुक्की व तोंडाला काळे फासण्यात आलेल्या महाराष्ट्र परिवहन मंडळाचे वाहक,चालक कोल्हापुरात दाखल होताच शिवसेनेच्या वतीने त्यांचा मानाचा भगवा फेटा घालून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व एसटी बस चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र असल्याची ग्वाही यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिली.

कोल्हापूर आगारातील एसटी चालक भास्कर जाधव आणि वाहक प्रशांत थोरात हे आज दुपारी कोल्हापुरात दाखल होताच, कोल्हापूर विभागाचे विभागीय नियंत्रक अधिकारी शिवाजी जाधव तसेच विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांच्या उपस्थितीत शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

शुक्रवारी रात्री चित्रदुर्ग होऊन कोल्हापूर कडे परत येत असताना महामार्गावर अचानक आलेल्या या करवे च्या गुंडांनी एसटी अडवून कन्नड भाषा येत नसल्याने आपल्याला दमदाटी केली एसटीवर काळे फासले एसटीवर लाथा बुक्क्या घातल्या तसेच आपल्यालाही धक्काबुक्की करून काळे फासल्याचा थरारक प्रसंग या चालक आणि वाहकांनी उपस्थितांना सांगितला. तसेच कर्नाटक परिवहन मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रसंगात आपल्याला सहकार्य केल्याचेही विभागीय नियंत्रण शिवाजी जाधव यांनी सांगितले.