कथा एका चवीची – पुरी हूं मैं…

>> रश्मी वारंग

पुरी हा लोकप्रिय पदार्थ विशेष प्रसंगात खास केला जातोच. लग्नापासून ते विविध समारंभात पुरी सर्वत्र आढळते. पोषणमूल्यं, डाएटच्या जमान्यात विविध पदार्थांची चिकित्सा होताना पुरीची लोकप्रियता अबाधित आहे. वैविध्यपूर्ण प्रकारे बनवली जाणारी पुरी, संस्कृत शब्द ‘पुरीका’ तर काही भाषांमध्ये पुडी असाही तिचा उच्चार आहे.

भारतातील विविध प्रांत त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण पदार्थांसाठी ओळखले जातात. पण संपूर्ण भारताला समानतेच्या धाग्याने जोडणारा पदार्थ म्हणजे पुरी.

संस्कृत शब्द ‘पुरीका’ म्हणजे भरलेली या अर्थाने हा ‘पुरी‘ शब्द मराठीच नव्हे तर अन्य भाषांमध्ये आला आहे. काही भाषांमध्ये ती पुरी आहे तर काही भाषांमध्ये पुडी. उच्चार भिन्न असला तरी पदार्थ तोच. गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल या तीन पदार्थांपासून लाटून बनवलेली पुरी उकळत्या तेलातून टम्म फुगून वर येणंही सगळीकडे तेच. फक्त प्रांतागणिक त्यात वापरले जाणारे अन्य पदार्थ वेगळे. काही भागात पुरीच्या पिठात ओवा, जिरं, पालक, मेथी, भोपळा असं काही वाढवलं जातं.

पुरीचे काही भाऊबंदही आहेत. भटुरा हा पुरीच्याच कुळातील पण तिप्पट मोठा पदार्थ. भटुरा यीस्ट वापरून तयार होतो तर पुरीचं पीठ न आंबवता बनवलं जातं. भारतातील सर्वात मोठी जत्रा असणाऱया ओडिशामधील बाली यात्रेच्या वेळी बनणारी थुनका पुरी खास आहे. ही पुरी मैद्यापासून बनवली जाते आणि ती आकाराने पण पुरीपेक्षा घसघशीत असते. ही पुरी पनीर आणि आलूगोबीच्या भाजीसह पत्रावळीवर खाण्याचा विशेष कार्पाम या यात्रेत पार पडतो.

पुरीचा आणखी एक लोकप्रिय अवतार म्हणजे उत्तर प्रदेशातील बेडमी पुरी. गव्हाचे पीठ, मसूर, आलं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून बनवलेली ही पुरी लोणच्यासोबत खाल्ली जाते. साध्या पुरीपेक्षा हिच्यात मीठ थोडं अधिक वापरलं जातं. याशिवाय चणाडाळ वापरून बनवलेली दालभरी पुरीही उत्तर प्रदेशाची खासियत आहे.

बंगाल आणि ओदिशातील लुची पुरी लोकप्रिय वर्गात मोडते. ही पुरीदेखील मैद्यापासून बनते आणि खास करून आलू दम, कोशा मांग्शो (बंगालमधील मटण रस्सा) यांच्या सोबत खाल्ली जाते. बंगालमध्ये एकादशीला तांदूळ वर्ज्य मानले जातात. अशा दिवशी विशेष करून लुची बनते. याशिवाय लुची आणि घुगनी ही जोडी इथे नाश्त्यासाठी आवडीचा पदार्थ आहे. घुगनी म्हणजे छोल्यांपासून बनवलेली विशिष्ट प्रकारची उसळीसारखी भाजी. संस्कृत रुचीचा अपभ्रंश म्हणजे लुची अशी उत्पत्ती सांगितली जाते. बंगाली मंडळींचे पुरीवर विशेष प्रेम असावे. लुचीप्रमाणेच राधाबल्लवी ही बंगाल प्रांतातील खास पुरी आहे. मैद्याच्या या पुऱयांमध्ये उडिद डाळीपासून बनवलेलं सारण भरलेलं असतं.

पुरीसारखा लोकप्रिय पदार्थ उपवासाला चालत नाही. यावर तोडगा म्हणून शिंगाडय़ाच्या पिठाची पुरी भारतात लोकप्रिय आहे. शिंगाडा पिठात उकडलेले बटाटे घालून ही पुरी बनते. भारतभरात तिला कुट्टूकी पुरी म्हटले जाते. मुघलांना प्रिय खुसखुस पुरी म्हणजे शाही प्रकरण. तुपात तळलेल्या या तिखट पुऱया म्हणजे जिभेचे निव्वळ चोचले.

पुरी विशेष प्रसंग अधोरेखित करते. लग्नापासून ते विविध समारंभात ती सर्वत्र आढळते. पोषणमूल्यं, डाएटच्या जमान्यात विविध पदार्थांची चिकित्सा होताना पुरीची लोकप्रियता अबाधित आहे. पुरी स्वतंत्र खाण्याचा पदार्थ नाही. तिला कोणाचा ना कोणाचा हात धरून यावं लागतं. श्रीखंड पुरी, आमरस पुरी, बटाटा भाजी पुरी या आवडत्या जोडय़ांत पुरी साथीदार बदलते पण स्वतचं महत्त्व कायम ठेवते. सगळ्यांसोबत जुळवून घेण्याचा तिचा हा स्वभाव आणि तेलात न्हाऊन आल्यावर दिसणारे सचैल टम्म फुगलेलं रूप खवय्यांसाठी पर्वणीच. त्यामुळेच ती अभिमानाने ‘पुरी हूं मैं’ म्हणत भारतातील घराघरांत मिरवते.

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)