
गुरुनाथ तेंडुलकर
‘डान्स फॉर बेटर हेल्थ’ हा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेला उपाम. संस्थेच्या वार्षिकोत्सवात उत्साही ज्येष्ठांनी अप्रतिम नृत्य सादरीकरण केले. उतारवयातील त्यांची ही ऊर्जा वाखाणण्यासारखीच होती.
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या वैद्यकीय शाखेतर्फे अनेक उपाम राबवले जातात. त्यातील एक उपाम आहे `डान्स फॉर बेटर हेल्थ’. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेला हा उपाम गेली आठ वर्षे सुरू आहे व या उपामाचा वार्षिकोत्सव पु. ल. देशपांडे सभागृहात संपन्न झाला. त्या वेळी या `डान्स फॉर बेटर हेल्थ’च्या 52 सदस्यांनी भाग घेऊन विविध नृत्य प्रकार सादर केले. `महाराष्ट्राची लोकधारा’ या विषयावर नृत्याविष्कार सादर करण्यात आला.
कार्पामाच्या आरंभीच ग्रुपच्या प्रमुख मार्गदर्शिका मानसी आपटे यांनी संत जनाबाई चौधरी लिखित ‘सरस्वती वंदना’ अत्यंत देखण्या अन् आल्हाददायक पद्धतीने सादर करून सर्व प्रेक्षकांच्या मनात एक भक्तिभाव जागवला. ‘चल गं सखे पंढरीला’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी’ आणि ‘माऊली माऊली’ या गाण्यांवर बसवलेल्या समूह नृत्याने सुरुवात झालेला हा कार्पाम उत्तरोत्तर रंगतच गेला. भजन, भारूड, गण-गौळण, गोंधळ, पोवाडा, तमाशा, लेझीम, शेतकरी नृत्य, होळीनृत्य, अगदी बैठकीची लावणीसुद्धा. एकंदरीत महाराष्ट्राच्या संत आणि संतपरंपरेतील बहुतेक सर्व प्रकारचे पारंपरिक नृत्य प्रकार या कार्पामात सादर करण्यात आले. त्याचबरोबर काही हिंदी आणि मराठी गाण्यांवरदेखील दिलखेचक आणि बक्षीसपात्र नृत्ये कलाकारांनी सादर केली. त्यात सीमा केळकर यांनी `पिया घर आयेंगे’ या गाण्यातून रामायणातील लक्ष्मणाच्या पत्नीच्या…उर्मिलेच्या मनाची घालमेल उत्तम रीत्या सादर केली. तसेच अस्मिता नामजोशी यांनी ‘मोहे रंग दो लाल` या गाण्यावर कथ्थक, वैजयंती थत्ते यांनी सादर केलेले ‘झुमका गिरा रे’ या गाण्यावरील नृत्यांसोबतच सावित्री अय्यर या अवघ्या एकोणनव्वद वर्षांच्या तरुणीने सादर केलेल्या ‘कशाला उद्याची बात’ या गाण्यावरच्या नृत्याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.
साक्षी शिणकर आणि शीला भुर्के यांनी सादर केलेल्या जोगव्याबरोबरच गीता अग्नी आणि प्रज्ञा बटकल या जोडीने सादर केलेल्या `मला पंढरीला नेलं गं बया…’ या पारंपरिक विनोदी भारुडाने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या कार्पामात ‘उदे गं अंबे उदे…’ या सुप्रसिद्ध गोंधळाच्या वेळी मोहिनी जुवेकर यांनी केलेले सादरीकरण तर शब्दांच्या पलीकडचे म्हणावे लागेल.
कार्पामाची सांगता करताना ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या वेळी तर सभागृहातील प्रत्येकानेच ठेका धरला होता. हे गीतनृत्य सादर करण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या सोबतीने जिजाऊ, सावित्रीबाई फुले तसेच ताराराणींच्या वेशभूषा केलेल्या व्यक्तिरेखा, मावळे, वासुदेव, गोंधळी यांच्यासारख्या पारंपरिक व्यक्तिरेखा मांडणारी मंडळीही होती. हातात भगवे ध्वज फडकावणाऱ्या कलावंतांमुळे तर या कार्पामाची भव्यता अधोरेखित झाली.
‘डान्स फॉर बेटर हेल्थ’ या उपामाला प्रोत्साहन देणारे संघ कार्यवाह महेश काळे आणि डॉ. रश्मी फडणवीस तसेच कार्याध्यक्ष उदय तारदळकर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यानंतर झालेल्या समारंभात कार्पामाच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी पारकर यांनी आपल्या भाषणातून नृत्याचे महत्त्व विशद करताना केलेल्या नृत्य करताना मेंदूत आणि परिणामत शरीरात कोणत्या प्रकारचे सकारात्मक बदल होतात हे सांगितले. त्याचबरोबर मानसिक आणि काही शारीरिक आजारांवर नृत्य ही एक उपचार पद्धती कशा प्रकारे काम करू शकते, हे परिणामकारक शब्दांत सांगितले. त्यानंतर सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका पूजा काळे यांनीदेखील नृत्यांचे महत्त्व विशद केले.
थोडक्यात सांगायचे तर एक अत्यंत देखणा आणि नेत्रदीपक कार्पाम संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर घरी परतताना प्रत्येक जण एक सकारात्मक ऊर्जेनं भारलेला होता हेच या कार्पामाचं फलित असे म्हणावे लागेल.