मॅरेथॉन शर्यतीतील 52 वर्षीय अनुभवी धावपटू नताली डाऊ हिने थायलंड-सिंगापूर अल्ट्रामॅरेथॉन ही 1000 किलोमीटरची शर्यत 12 दिवसांत पूर्ण करण्याचा पराक्रम केलाय. ही शर्यत सर्वात जलद पूर्ण केल्याबद्दल तिला सिंगापूरचा किताब मिळाला, आता ती मलेशियाकडील ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’चे सर्टिफिकेट मिळण्याची वाट बघत आहे.
नताली डाऊ हिने अल्ट्रा मॅरेथॉनदरम्यान थायलंड, मलेशिया व सिंगापूर असा प्रवास केला. प्रचंड उष्णता आणि पंबरेला झालेल्या दुखापतीनंतरही धैर्य अन् चिकाटीच्या जोरावर नतालीने ही शर्यत पूर्ण केली. शर्यत पूर्ण केल्यानंतर नताली म्हणाली, ‘आपण ही शर्यत खरचं पूर्ण करू काय? असा प्रश्न मनात निर्माण झाला होता. मात्र खेळातील आव्हाने स्वीकारायला आवडतात. निराश होणं माझ्या स्वभावातच नाही.’ या अल्ट्रा मॅरेथॉनच्या माध्यमातून मुली व महिलांना मदत करणाऱया गर्ल्स ग्लोबल चॅरिटीसाठी 50 हजार डॉलरहून अधिकचा मदतनिधी जमा झाला.
अन् उष्णतेने बूट वितळले..
अल्ट्रा शर्यतीत आपण पहिले येतो की शेवट यामुळे काही बिघडत नाही. मात्र आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं, हा आनंद अधिक महत्त्वाचा असतो. माझ्यासाठी ही शर्यत सोपी नव्हती. 35 डिग्री सेल्सियस तापमानात धावल्याने माझे बूट अक्षरशः वितळले होते. पहिल्याच दिवशी कमरेच्या दुखण्याने डोके वर काढले. तिसऱया दिवशी उन्हाळीचा (मूत्रमार्गात संसर्ग) प्रचंड त्रास झाला, मात्र तरीही रोज 84 किलोमीटर अंतर धावायचेच. सकाळी झोपेतून उठताना संपूर्ण अंग दुखायचे. प्रचंड थकवा.. सुटलेले पाय.. अन् कुटुंबीयांना पाहण्याची आतुरता.. असा रोजचा दिनक्रम होता. फिनिशिंग लाईन खूप दूर आहे, या विचारानेही अवसान गळायचे, मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अखेर ही शर्यत पूर्ण केली, असे अनुभवाचे बोल नताली डाऊ हिने ‘वृत्तसंस्थेशी बोलताना काढले.