पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ युवासेनेचे आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक येथील प्रास्तावित पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ कुडाळ तालुक्यातील प्रत्येक कॉलेजच्या बाहेर तसेच कुडाळ बस स्थानकाच्या बाहेर युवासेनेच्या वतीने लवकरच सह्यांची मोहीम घेण्यात येणार आहे. आमदार वैभव नाईक आणि युवासेना कोकण सचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत हि सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी पर्यटन प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु येथील स्थानिक सत्तेतील मंत्री मात्र चिडीचूप आहेत. केंद्रीय मंत्री राणे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर तोंडसुख घेणारे राणे यांचे दोन्ही पुत्र आणि भाजप पदाधिकारी यावर काहीही बोलत नाहीत आणि अशाप्रकारे प्रकल्प जाणे हे सत्तेतील लोकांचे भाजप च्या स्थानिक नेत्यांचे अपयश आहे. मात्र युवासेना गप्प बसणार नाही. याबाबत आवाज उठवणार आहे.

युवासेना तसेच कॉलेज कक्षच्या माध्यमातून हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ प्रत्येक कॉलेजच्या बाहेर सह्यांची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच कुडाळ बस स्थानकाच्या बाहेर सह्यांची मोहीम घेण्यात येणार आहे, अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. यावेळी युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे, युवासेना कुडाळ शहर प्रमुख संदिप म्हाडेश्वर, युवासेना कुडाळ शहर संघटक अमित राणे, युवासेना उपतालुकप्रमुख सागर भोगटे, विनय गावडे, स्वनिल शिंदे, युवासेना उपशहरप्रमुख रुपेश कांबळी आदि उपस्थित होते.