देशात लोकशाही मारली गेली; हिटलरशाही सुरू झाली, आता निकाल जनतेच्या न्यायालयात होईल

दिवसाढवळ्या लोकशाहीची निर्लज्ज हत्या देशात 75 वर्षांत पाहिली नाही. देशात लोकशाही मारली गेली आहे आणि हिटलरशाही सुरू झाली आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. आता जनतेच्या न्यायालयातच निकाल होईल, असे त्यांनी सांगितले.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा मंगळवारपासून पश्चिम महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू आहे. आज हुपरी, ईश्वरपूर आणि पाटण तालुक्यात आदित्य ठाकरे यांच्या प्रचंड जाहीर सभा झाल्या. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा जोरदार समाचार घेतला.

आदित्य ठाकरे म्हणाले, 2024मध्ये अशी गद्दारी आणि राजकारण कायदेशीर झाले तर आपले संविधान बदलले जाईल. भाजपला संविधान बदलायचे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान भाजपला मान्य नाही हे स्पष्ट होईल.

नार्वेकर कोणत्या पक्षप्रमुखांच्या एबी फॉर्मवर लढत होते

राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते. त्या वेळी ते कुठल्या पक्षप्रमुखांचे आदेश घेत होते? ते कोणत्या पक्षप्रमुखांच्या एबी फॉर्मवर लढत होते, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले. दिवसाढवळ्या लोकशाहीची निर्लज्ज हत्या देशात 75 वर्षांत पाहिली नाही.

खोके सरकारची उलटतपासणी जनता करेल

आता खोके सरकारची उलटतपासणी लोकशाहीत जनता करेल. सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहेतच; पण त्याहीपेक्षा जास्त अपेक्षा जनतेकडून आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.