मुंबई विद्यापीठात बीबीए, बीसीए अभ्यासक्रम सुरू करा!, युवासेनेची आग्रही मागणी

मुंबई विद्यापीठाअंतर्गत बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रम 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात यावेत, तसेच या कोर्सेससाठी अभ्यास मंडळे स्थापन करून अभ्यासक्रम तयार करावा, अशी मागणी युवासेनेच्या वतीने नुकतीच मुंबई विद्यापीठाकडे करण्यात आली असून यासंदर्भात निवेदन प्र कुलगुरू यांना देण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या सुरुवातीस प्रसिद्ध झालेल्या एआयसीटीईच्या परिपत्रकानुसार बीएमएस, बीबीए, बीसीए हे पदवी अभ्यासक्रम एआयसीटीईच्या अखत्यारित आणण्यात आले. त्यानुसार ज्या शैक्षणिक संस्थांना तसेच व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना या अभ्यासक्रमास अर्ज करायचा असल्यास त्यांना तसे करण्याची मुभा दिली. या परिपत्रकानुसार अनेक व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनी या कोर्सेससाठी फी भरून अर्ज केले होते आणि त्यांना सदर कोर्सस 2024-25 पासून सुरू करण्याबाबत मान्यता मिळाली.

त्यानंतर मुंबई विद्यापीठाकडे अर्ज करून शुल्क भरून मान्यतेसाठी अर्ज सादर केले. परंतु बीबीए, बीसीए कोर्सेससाठी विद्यापीठाकडे बोर्ड ऑफ स्टडीज व अभ्यासक्रम तयार नसल्याने 2024-25 साठी या संस्थांना हे कोर्सेस चालू करता येणार नाहीत असे या महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले. वास्तविक विद्यापीठात अभ्यास मंडळ स्थापन करून या कोर्सेसना मान्यता देणे आवश्यक होते, याकडे युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी लक्ष वेधले.

…तर जोरदार आंदोलन करू

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे अनेक विद्यार्थी, पालकांकडून प्राप्त तक्रारींची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठ अंतर्गत बीबीए, बीसीए अभ्यासक्रम का सुरू केले नाही? असा जाब विचारला. त्यावर डॉ. भामरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेने दिला.