सीईटीच्या गुणांमध्ये गोंधळ, विद्यार्थ्यांची तक्रार; युवासेनेकडून दुरुस्तीची मागणी

सीईटी सेलकडून नुकत्याच जाहीर झालेल्या अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र प्रवेशाच्या निकालात गुण व श्रेणी देण्यात चूक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. उत्तरपत्रिकेतील गुण आणि श्रेणी यात तफावत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

सीईटी सेलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सीईटीतील गुणांबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनुसार सीईटी सेलने नुकत्याच जाहीर केलेल्या अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र निकालात गुण व श्रेणी देण्यात चूक झाली आहे. त्यांना देण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेनुसार मिळालेल्या गुणांमध्ये तफावत आहे. या तक्रारीची दखल घेऊन युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन मेल करून तातडीने निकाल फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच याबाबत युवासेना सीईटी सेल संचालकांची भेटही या प्रश्नी घेणार आहेत.