हिंदूंवरील अन्याय सहन होत नाही म्हणता, मग बांगलादेशसोबत क्रिकेट कसे खेळता?; आदित्य ठाकरे यांचा भाजपला सवाल

भाजपचे हिंदुत्व हे बेगडी आहे. हिंदूंवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, असे भाजपवाले नेहमी सांगतात. बांगलादेशमधील हिंदूंवर अन्याय होत असताना बांगलादेशसोबत तुम्ही क्रिकेट कसे खेळता, असा थेट सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज भाजपला केला. हेच काँग्रेसच्या काळात झाले असते तर भाजप रस्त्यावर उतरली असती. आता कुठे गेले तुमचे हिंदुत्व, असा सवालही त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप आणि मिंधे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या दोन वर्षांत मिंधे सरकारने महाराष्ट्राला मागे नेले. फोडाफोडी हेच भाजपचे राजकारण आहे. जनता या राजकारणाला आता कंटाळली आहे. एक स्थिर सरकार लोकांना हवे आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. ते आम्हाला नक्की निवडून देतील आणि सत्ता आमचीच येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुस्लिम आम्हाला मतदान करतात याचा भाजपला का त्रास होतो? हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे. भूमिपुत्रांना प्राध्यान्य मिळाले पाहिजे हीच आमची भूमिका आहे. ‘घर का चुल्हा जलाओ, घर मत जलाओ’ हे आमचे ध्येय आहे. मात्र भाजप घर जाळण्याचे काम करीत आहे. सत्तेसाठी ते समाजात तेढ निर्माण करीत आहे, असेही ते म्हणाले. मात्र आम्ही संविधानाच्या सोबत आहोत, तर भाजपला संविधान संपवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोस्टल रोड बँकेसारखा उघडतो!

महाविकास आघाडीने सुरू केलेले प्रकल्प मिंधे व भाजपला पूर्ण करता आले नाहीत. हे लोक प्रकल्प रेंगाळत ठेवून त्याचा खर्च वाढवत आहेत. कोस्टल रोडचे श्रेय घेऊन हे मिरवतात, पण कोस्टल रोड बँकेच्या वेळेसारखा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत खुला केला जातो, असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

सरकारला खोटं बोलायला लाज वाटत नाही!

लाडकी बहीण योजना काय आहे हे एकदा ठरवा. कोणी देवा भाऊ म्हणतो, कोण याला पिंक कलर देतो… यांना खोटे बोलायला लाज वाटत नाही, असा टोला लगावत आमची सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणी सुरक्षितदेखील असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बदलापूर प्रकरणातील आरोपीला भरचौकात फाशी द्या, अशीच आमची मागणी होती. मात्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवणे तितकेच महत्त्वाचे आहे. येथे कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, हेही स्पष्ट व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले.