गोरेगावमध्ये तरुणाची उडी मारून आत्महत्या

गोरेगाव मेट्रो स्थानक परिसरातून उडी मारून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मेट्रो स्थानकातून आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे.

एमएमआरडीएच्या वतीने मेट्रो (गोरेगाव ते दहिसर) हा प्रकल्प राबवला जात आहे. गोरेगाव पश्चिम येथे मेट्रोचे स्थानक आहे. गोरेगावच्या भगतसिंग नगर येथे मृत तरुण आईवडिलांसोबत राहत होता. आज संध्याकाळी तो तरुण गोरेगाव पश्चिम मेट्रो स्थानकात आला. त्याने मेट्रोचे तिकीट खरेदी केले. तिकीट खरेदी केल्यानंतर तो फलाटावर गेला. त्यानंतर त्याने ग्रील ओलांडून तो रुळाजवळ गेला. तेथून त्याने उडी मारून आत्महत्या केली.

हा प्रकार काही स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आला. त्याला जखमी अवस्थेत मालाड येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच बांगूर नगर पोलीस घटनास्थळी आले. तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तो तरुण नैराश्यात असल्याचे समजते. बांगूर नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.