हिंदुस्थानपेक्षा अमेरिकेत ‘योग’ची जास्त क्रेझ, नियमित योग करण्यात महिला आघाडीवर

आरोग्यासाठी योग करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. योगाचे महत्त्व आता जगभरात पोहोचले असून हिंदुस्थानच्या तुलनेत अमेरिकेत योग जास्त केला जातो, अशी माहिती एका सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. अमेरिकेत लोकसंख्येच्या तुलनेत 20 टक्के लोक हे योग करत आहेत. अमेरिकेत आता योगाला केवळ शारीरिक व्यायाम म्हणून पाहिले जात नसून आरोग्य, अध्यात्म, आध्यात्मिक शांतता आणि साधनाच्या रूपात पाहिले जात आहे. 2002 मध्ये जिथे केवळ 4 टक्के अमेरिकी योगाचा सराव करत होते, तेथे ही संख्या आता अनेक पटींनी वाढली आहे. सीडीसीच्या सर्वेक्षणानुसार, 90 टक्के अमेरिकी आता योगाची माहिती जाणून आहेत. तीन वर्षांपूर्वी ही संख्या 75 टक्के इतकी होती. मान आणि पाठदुखीने त्रस्त लोक प्रामुख्याने योगाची मदत घेत आहेत. योग हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे, असे 75 टक्के लोक मानत असल्याचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या (सीडीसी) ने म्हटले आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिला आघाडीवर

अमेरिकेत योग करण्यात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. सर्वेक्षणानुसार, 23 टक्के महिला नियमित योग करतात. हे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे. अमेरिकन महिला योगाकडे मानसिक शांतता व संतुलन कायम राखण्यासाठी निवडतात. याशिवाय महिला याला एक सुरक्षित आणि फायदेशीर व्यायाम मानतात. योगाला ध्यान आणि मेडिटेशनचा हिस्साही मानले जात आहे.