पिवळ्या पट्ट्यातील 475 घरांना पुराचा धोका कायमच!; सांगली मनपा काय करणार उपाययोजना?

शहरातील कृष्णा नदीने इशारा पातळी गाठल्यानंतर शहरातील अनेक उपनगरे पाण्याखाली जातात. पिवळ्या पट्ट्यात असलेल्या आठ उपनगरांतील सुमारे 475 घरांना पुराचा फटका बसतो. दरवर्षी ही घरे वाढत चालली आहेत. यावर महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पिवळ्या पट्ट्यात येणाऱ्या घरांना बांधकाम परवाना न देणे, गुंठेवारी भागातील घरे नियमित न करणे, नवीन घरे होऊ न देणे अशी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा कृष्णेने इशारा पातळी गाठली म्हणजे सांगलीच्या उपनगरांना धोका कायमचाच असणार आहे.

सांगली शहराला 2005, 2019 व 2021 साली महापुराचा फटका बसला. नागरिकांसह व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शहराची अधोगतीदेखील झाली. पण, या महापुराची कारणे प्रशासनाकडून शोधली जात नाहीत. केवळ पूरपट्टे तयार केले जातात, महापूर आला की सहा-नऊ महिने या पूरपट्ट्यात विशेष लक्ष दिले जाते. त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या…’ अशी परिस्थिती महापालिका प्रशासनाची झाली आहे. महापालिकेने पिवळे, नारंगी व लाल असे तीन क्षेत्र केले आहेत. आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 40 फूट झाली की, सांगलीला ही इशारा पातळी समजले जाते. त्याला पिवळे क्षेत्र महापालिकेने घोषित केले आहे. या पिवळ्या पट्ट्यात सुमारे 475 घरे आहेत, तर शंभरहून अधिक व्यावसायिक आहेत. मनपाच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये हे सर्व भाग येतात.

कृष्णा नदीला पूर आल्यानंतर प्रथम बायपास रोडवरील नैसर्गिक नाल्यातून बॅकवॉटरचे पाणी शहरातील काही उपनगरांमध्ये घुसते. पाणीपातळी 30 फुटांवर गेल्यानंतर शहरातील भाग बाधित होण्यास सुरुवात होते. सूर्यवंशी प्लॉटपासून पाणी येण्यास सुरुवात होते. त्यानंतर इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, काकानगर, पसायदान कॉलनी, शिवशंभो चौक, मगरमच्छ कॉलनी येथील कुटुंबांना स्थलांतर व्हावे लागते. 40 फुटांपर्यंत म्हणजे पिवळ्या पट्ट्यात सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, काकानगरसमोरील घरे, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी गल्ली क्रमांक एक व दोनचा समावेश आहे. याशिवाय कर्नाळ रोड परिसर व जुना बुधगाव रस्ता परिसरातील पश्चिम भागातील घरे व व्यावसायिकांचा समावेश होतो. मुख्य बायपास रोडवरील नाल्यातून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर या भागाला पुराच्या पाण्याचा वेढा बसतो. अनेकांनी नाल्यावर अतिक्रमण केल्यामुळे त्याचा फटका या परिसरातील घरांना बसत आहे. वास्तविक मनपा प्रशासनाने पूरपट्ट्यातील किमान पिवळ्या पट्ट्यातील घरांना बांधकाम परवाना देता कामा नये. दरवर्षी भराव टाकून अनेक घरे थाटली जातात. त्यामुळे दरवर्षी पूरबाधित होणाऱ्या कुटुंबीयांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.