Yavatmal News – शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिली ‘वरळी’ मटक्याची जंत्री, हप्तेखोरीवरून विचारला जाब

>>प्रसाद नायगावकर

कमी कष्टात जास्त पैसे कमविण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत जिल्ह्यात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. अशा धंद्याकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रानच मिळाले आहे. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मात्र जिल्हा पोलीस दलातील पोलिसांच्या हप्तेखोरीवर अंगुलीनिर्देश करीत थेट जाब विचारला आहे.

जिल्ह्यात मटका, जुगार क्लब, अवैध रेती तस्करी, गोवंश तस्करी, गुटखा तस्करी, गांजा तस्करी, भिंगरी, चक्री जुगार, अवैध दारू विक्री असे अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. विशेषतः राळेगाव तालुका अवैध धंद्याचे माहेरघर बनला आहे. राळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम चालणारे अवैध धंदे आणि त्यातून संबंधित यंत्रणेला महिन्याकाठी मिळणारे ‘अर्थाजन’ याचा थेट पुरावाच त्यांनी माध्यमांसमोर आणलेला आहे. असला प्रकार विद्यमान एसपी कुमार चिंता यांनी तत्काळ थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या जाहीर पत्रकात जिल्हा पोलीस दलातील काही अधिकारी, पथके, पथकप्रमुख व तत्सम यंत्रणा यांना महिन्याकाठी किती हप्ता दिला जातो, याची यादीच त्यांनी जाहीर केली आहे.

राळेगावातील अवैध धंदे तत्काळ थांबवावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्याकडे करण्यात आली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, विधानसभा प्रमुख संतोष ढवळे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, जिल्हा सचिव तुषार देशमुख आदी उपस्थित होते.