Yavatmal News : सांडपण्यात पाईपलाईन फुटली, दूषित पाण्यामुळे अख्खं गाव आजारी!

>>प्रसाद नायगावकर

यवतमाळ तालुक्यातील शेंदुरसनी येथे दूषित पाणी पिल्याने सुमारे 57 जणांची प्रकृती बिघडली. सांडपाण्यात पिण्याच्या पाण्याची पाईपलाई फुटल्यामुळे नागरिकांना गंभीर समस्या निर्माण झाली होती. मात्र आरोग्य यंत्रणेने ग्रामस्थांवर तात्काळ उपचार केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

शेंदुरसनी या गावामध्ये मागील काही दिवासांपासून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून दूषित पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे गावातील नागरिकांना उलटी, मळमळ आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला. सुरुवातील पावसामुळे हा त्रास होत असल्याचे ग्रामस्थांना वाटत होते. परंतु 13 जुलै रोजी गावातील अनेक ग्रामस्थांना हा त्रास जाणवु लागला. घटनेचे गांभीऱ्य लक्षात घेता लोणबेहळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतिक वाघमोडे व त्यांचे सर्व सहकारी नागरिकांच्या तपासणीसाठी गावात हजर झाले. तपासणी केली असता गावातील 57 लोकांना हा त्रास होत असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे गावातील शाळेमध्ये उपचार सुरू करण्यात आले. 14 ग्रामस्थांना सलाईन लावण्यात आली, तर इतरांना काही सुचना आणि ओषधे देऊन घरी पाठवण्यात आले.

एकाच वेळी गावातील 57 लोकांना एकच त्रास झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चाचणी केली असता ते पाणी दूषित असल्याचे उघड झाले. गावात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सांडपाणी वाहून नेणाऱ्या एका नालीमध्ये फुटली होती. त्यामुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले आणि तेच पाणी ग्रामस्थ गेल्या तीन दिवसांपासून पीत होते. ग्रामस्थांनी तात्काळ फुटलेली पाईपलाईन दुरुस्थ करून शुद्ध पाण्याचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. आरोग्य यंत्रना वेळीच गावात पोहचल्यामुळे परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.