>>प्रसाद नायगावकर
वारंवार सूचना देऊनही पोलिसांना न जुमानता वनोजादेवी येथील बस थांब्याजवळ अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या दुकानाला गावातील महिलांनी आग लावली. यावेळी अवैध दारू विक्री करणारा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. यामुळे वणी तालुक्यातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी चौकीवर अवैध दारू विक्री सुरू असून, यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्री थांबविण्याची मागणी महिलांनी पोलिसांकडे केली होती. तरीही संबंधित मुजोर दारू विक्रेता विक्री करीत होता. चौकीवर अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याची माहिती मिळताच बहुसंख्येने असलेल्या महिलांनी त्याठिकाणी धाड टाकली. महिलांचा रौद्ररुप पाहून अवैध दारू विक्रेता चंद्रकांत सुधाकर भोसले (रा.नांदेपेरा) हा मुद्देमाल सोडून पळून गेला. देशी दारूचे 52 पव्वे आणि विदेशी दारूच्या सहा बॉटल जप्त करीत महिलांनी दारूच्या दुकानाला आग लावली.
View this post on Instagram
वणी तालुक्यात अवैध दारू विक्रीचे प्रमाण जास्तच वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वणी तालुक्यातील मंदर येथे अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी एल्गार पुकारत धाब्याला आग लावली. तसेच धाबा चालक व धाब्यातील एका सहकाऱ्याला चांगलाच धु धु धुतला यवतमाळ जिल्ह्यातील वणी-घुग्घुस रोडवर निलगिरी बन जवळ ही घटना घडली होती. प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संपूर्ण वणी तालुक्यात प्रशासनाविरुद्ध चांगलाच रोष आहे.
नेहमीप्रमाणे अशा घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येते . महिलांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आरोपी चंद्रकांत भोसले, त्याचा सहकारी उमेश हरिश्चंद्र चांदेकर (रा. मजरा) या दोघांना ताब्यात घेत दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तसेच देशी दारूचे 34 पव्वेही जप्त केले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात नव्याने पोलीस अधीक्षक म्हणून कुमार चिंता नुकतेच रुजू झाले आहेत. त्यांनी अशा प्रकारणांकडे जातीने लक्ष देऊन अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई कारवाई अशी मागणी या महिला वर्गाकडून होत आहे .