Yavatmal News – जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या आमसभेत प्रचंड गोंधळ, प्रश्नांच्या भडिमारामुळे काही मिनिटातच सभा गुंडाळली

>>प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची आमसभा आज राळेगाव येथे घेण्यात आली होती. सभेला सुरुवात झाल्यानंतर सभासदांनी प्रश्नांचा प्रचंड भडीमार केला. त्यामुळे सत्ताधारी अध्यक्षाची प्रश्नांची उत्तरे देताना चांगलीच दमछाक झाली. यानंतर प्रचंड गोंधळ उडाला आणि विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. यामुळे सत्त्ताधारी आणि वर्धक क्रमाने सामने आले आणि अवघ्या काही मिनिटातच सभा गुंडाळण्यात आली.

मागील दोन वर्षांपूर्वी परिवर्तन पॅनलचे संचालक मंडळ पतसंस्थेमध्ये सत्तारूढ झाले. या दोन वर्षाचा त्यांचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त राहिला असून सभासदांचा रोष ओढून घेणारा ठरला आहे. पतसंस्थेमध्ये घेण्यात आलेल्या 47 कोटीच्या बोगस ठेवी, पाचशे सभासदांवर लावण्यात आलेला अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड, नियमबाह्य कर्ज, वाढलेला एनपीए, कार्यालयीन खर्च, किरकोळ खर्च, आमसभा खर्च, न्यायालयीन खर्च, प्रवास खर्च आधी खर्चांमध्ये झालेली भरमसाठ वाढ या सर्व प्रश्नांवर आज सभासदांनी आमसभेत अनेक प्रश्न अध्यक्षाला विचारले. संस्थेने सुरू केलेले चक्रवाढ व्याज, अपघात विमा मध्ये वाढविलेला प्रीमियम, अनावश्यक लॉकर सुविधा, अनाधिकृत बांधकाम आणि नोकर भरती संचालकांना दिलेले नियमबाह्य कर्ज या विषयांवर सभेतील सभासदांनी अध्यक्षांना प्रश्न विचारले. परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष देऊ शकले नाहीत. सभासदांच्या प्रश्नापुढे हातबल झालेल्या अध्यक्षांनी शेवटी इशारा करताच त्यांनी सभेमध्ये आणलेल्या काही विशिष्ट लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. गोंधळ एवढा वाढला की विरोधक यांच्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले. सभासदांच्या वतीने आसाराम चव्हाण, अनिल सरतापे, प्रवीण राणे, प्रवीण दरेकर, नंदेश चव्हाण, कैलास चव्हाण, रविनाश राठोड, भास्कर डहाके, शशिकांत खडसे, रमेश धावणकर, मधुकर कोडापे, श्रीराम जिद्देवार, रवी आडे आणि मनीष नाकतोडे आदी सदस्यांनी प्रश्नाचा भडीमार केला. शेवटी गोंधळातच आमसभा आटोपती घेण्याची नामुष्की सत्ताधारी संचालक मंडळावर आली व त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.