Yavatmal News – सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय वणी वाहतूक पोलिसांची पोलखोल करणारा फलक

>>प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात सर्वच रस्त्यांवर अवैध वाहतूक सर्रासपणे अव्याहत सुरू आहे . त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. याशिवाय शहरात ऑटो चालकांची मनमानी सुरू आहे. वणी वाहतूक विभाग, अवैध वाहतूक करणारे आणि मनमानी करणारे ऑटो चालक यांच्यात इतके मधुर संबंध आहेत की जणू काही या अवैध व्यावसायिकांना पोलीस प्रशासनाची मूक संमती आहे. याला कंटाळून बस स्थानकासमोर एका मेडिकल व्यावसायिकाने चक्क आपल्या दुकानासमोर ‘अवैध ऑटोरिक्षा स्टँड’ असा फलक लावला आहे. या फलकाची शहरात चांगलीच चर्चा रंगली असून वाहतूक विभागाचे लक्तरे वेशीवर टांगले गेले आहे.

वणी उप विभागात असलेल्या कोळसा, दगड, डोलोमाईट खाणी तसेच उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. छोटे मोठे अपघात तर नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी जिल्हा वाहतूक विभागाने वणी येथे उप शाखा कार्यान्वित केली आहे. मात्र वाहतूक शाखेतील कर्मचारी फक्त वसुलीत दंग असल्याचे आरोप होत आहे. वणी शहरातून ग्रामीण भागाकडे जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहने धावतात. शहरात बस स्थानक समोर, टिळक चौक, साई मंदिर चौक, जटाशंकर चौक, गाडगे बाबा चौक, दीपक टॉकीज चौपाटी येथे प्रवासी ऑटोरिक्षाचा जमावडा असतो. हे वाहतूकदार दुकानासमोर ऑटो उभे करून असल्यामुळे व्यावसायिकांना आणि पादचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

बस स्थानक परिसरात ऑटोचालकांची धुमाकूळ नेहमी पाहायला मिळते. ऑटो चालक दुकानदार किंवा इतर प्रवाश्यांना जुमानत नाही. या बाबींना कंटाळून बस स्थानक समोर माधव मेडिकल स्टोअरच्या संचालकाने अफलातून आयडिया वापरून आपल्या दुकानासमोर दर्शनीभागात चक्क ‘हप्तेखोर वाहतूक कर्मचारी किंवा लोक प्रतिनिधी यांना समर्पित अवैध ऑटोरिक्षा स्टँड’ असा फलक लावला. या फलकाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या फलकाने तरी अवैध प्रवासी वाहतूक बाबत वाहतूक विभाग आणि लोक प्रतिनिधी यांना जाग येईल का आणि नव्यानेच रुजू झालेले यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता हे यावर कसा लगाम लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .