शाळांमध्ये सीसीटीव्ही, महिला सुरक्षा रक्षक नेमणुकीच्या खर्चासाठी सरकारकडे पाठपुरावा; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आश्वासन

मुंबई आणि ठाण्यातील खासगी शिक्षण संस्थांच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील. शाळांमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचारासारख्या घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक यांसारख्या खर्चिक बाबींसाठी शासनाकडे लेखी मागणी करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने खासगी शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींना दिले.

घाटकोपर येथील पुणे विद्यार्थीगृहाच्या वास्तूत ठाणे आणि मुंबईतील खासगी शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शाळा प्रशासन, पालकवर्ग आणि एकूणच समाज या सर्वांनी जागरुक राहणे गरजेचे आहे, असे राजेंद्र प्रधान म्हणाले. वारंवार राजकीय हस्तक्षेप होत असल्याने वातावरण गढूळ होण्याची भीती ठाणे शाखेचे उपाध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केली. या बैठकीत ज्ञानसाधना महाविद्यालयाचे कमलेश प्रधान, संकेत शिक्षण संस्थेचे व्ही. पी. सिंग, शशांक म्हात्रे, आर. जी. हुले, राजाराम रसाळ, गणेश कांबळे, डॉ. मनीषा नायर, रामदास इंगळे, गिरीधर गांगण, गणेश बाटे, हरिश्चंद्र पाटील, सीमा पाटील, मेजर सुधीर सावंत, महामुंबई शिक्षण संस्था महामंडळाचे सहकार्यवाह डॉ. विनय राऊत, कार्यवाह सदानंद रावराणे आदी उपस्थित होते. राजेंद्र बोऱहाडे यांनी आभार मानले. दरम्यान, प्रचंड दडपणाखाली शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाला शिक्षण देण्याचे मूळ काम करावे लागत आहे, असे डॉ. विनय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, बैठकीत मांडण्यात आलेल्या शाळा संचालकांच्या समस्यांबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन विजय पाटील यांनी दिले.