राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष – देशी खेळांचा ‘गेम’

>>विठ्ठल देवकाते

पूर्वीच्या काळी फ्लॅट संस्कृती नव्हती. त्यामुळे घराला अंगण आणि खेळ खेळायला बरीच मोठी जागा होती. म्हणून त्या काळात मुले कुस्ती, खो-खो, कबड्डी, मल्लखांब, आटय़ापाटय़ा, लगोरी, लंगडी, विटी-दांडू या प्रमुख खेळांसह सूरपारंब्या, मामाचं पत्र, चोर-पोलीस असे अनेक खेळ खेळायचे. मात्र, सध्याच्या डिजिटल युगामध्ये मुले देशी खेळांपासून दूर जात असून, आता तर या खेळांचा ‘गेम’च झालाय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हिंदुस्थानी संस्कृती जपण्यासाठी आज त्यांना या खेळांची आठवण करून देणे गरजेचे आहे. सुदृढ आयुष्य जगण्यासाठी जसे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत घटकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे ‘देशी खेळ’देखील तेवढेच आवश्यक आहेत.

‘देशी खेळ’ हे गावांमध्येच खेळले जायचे असे नाही, तर शहरांमध्येदेखील खेळले जायचे. या देशी खेळांमुळे शारीरिक हालचाली तर व्हायच्याच; सोबतच मनोरंजन तसेच बौद्धिक व मानसिक विकासदेखील साधला जायचा. परंतु आता हे चित्र बदललेले आहे. याला कारण आहे टीव्ही, इंटरनेट, मोबाईल यांसारख्या गोष्टी. आजची पिढी ही व्हिडीओ गेम्स, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप यामध्ये अडकून पडल्यामुळे काहींना तर देशी खेळ कोणते हेदेखील माहीत नाही. शहरीकरणामुळे फ्लॅट संस्कृती आली. जंगलांची जागा मोठमोठय़ा इमारतींनी घेतली. फ्लॅट सिस्टममुळे मुलांचे विश्व चार भिंतींच्या आतच मर्यादित राहिले. याचा परिणाम काही प्रमाणात मुलांवर होतोय यात काहीही दुमत नाही. या डिजिटल गोष्टींचा वापर वाढल्यामुळे मुलांमध्ये एकलकोंडेपणा आणि चिडचिडेपणा वाढला आहे. या साऱ्या गोष्टींवर आळा घालायचा असेल तर मुलांना देशी खेळांकडे आकर्षित करायला हवे.

देशी खेळांचे व्यावसायीकरण होण्याची गरज

अलीकडच्या काळात क्रिकेटप्रमाणेच बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, नेमबाजी या खेळांनीही हिंदुस्थानात कात टाकायला सुरुवात केली आहे. याला कारण म्हणजे, या खेळांचेही व्यावसायिकरण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता देशी खेळांचेही व्यावसायिकरण होण्याची नितांत गरज आहे. प्रो-कबड्डीमुळे कबड्डी या मर्दानी खेळाला नवसंजीवनी मिळाली. अशीच क्रांती इतर देशी खेळांमध्येही व्हायला हवी. खो-खो, मल्लखांब, आटय़ापाटय़ा, विटीदांडू आदी मैदानी खेळांचे व्यावसायिकरण व्हायला हवे.

देशी खेळांची शाळा

देशी खेळ टिकले पाहिजेत, व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि बलोपासनेसाठी हे खेळ किती महत्त्वाचे आहेत यावर फक्त विचारमंथन होत असते. मात्र, या खेळांना चालना मिळण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. शालेय स्तरावर काही देशी खेळांच्या स्पर्धा अनिवार्य करायला हव्यात. सध्यातरी देशी खेळांना शालेय स्तरावर थारा नाही. शासकीय आणि शालेय पातळीवर ‘आयपीएल’सारख्या लीगप्रमाणे या देशी खेळांच्या पुनरुज्जीवनासाठी काही नवीन प्रयोग करता येतील काय याचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणीही व्हायला हवी. शाळेतच ‘देशी खेळां’बद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हायला पाहिजे, तर आणि तरच देशी खेळ वाचतील.