क्लासिक – पुस्तकाचं आंगडं टोपडं!

>>सौरभ सद्योजात

The more I think about it, the more I am convinced that a cover is a sort of translation, that is, an interpretation of my words in another language — a visual one.

एखाद्या लेखकाच्या लेखनाचा, भावभावनांचा सुगंधित भार पेलण्याचं कार्य पुस्तकाचं मुखपृष्ठ करत असतं. वर दिलेल्या इंग्रजी ओळींतून प्रसिद्ध लेखिका झुंपा लाहिरी हेच सांगू पाहत आहेत. याही पुढे जात त्या जबाबदारीने सांगू पाहतात की, एखाद्या ग्रंथाचा आणि त्याच्या मुखपृष्ठाचा आंतरसंबंध नीट प्रस्थापित होणं आत्यंतिक गरजेचं असतं आणि याबाबत त्यांनी केलेली चिंतनशील मांडणी आधी भाषणात, नंतर दीर्घ निबंधात आणि अखेर एका देखण्या पुस्तकात परिवर्तित झाली. `The Clothing of Books’ हे त्या पुस्तकाचं नाव! हे नाव इतकं समर्पक आहे की, हा ग्रंथ वाचल्यानंतर ‘मुखपृष्ठ’ या शब्दाचं दुबळेपण आपल्या लक्षात येऊ लागतं.

झुंपा अगदी जाणूनबुजून पुस्तकांचे ‘कपडे’ अशी मांडणी करताना दिसतात. कारण माणसं जे परिधान करतात, त्यावरून इतर व्यक्ती त्यांच्याबाबत काही धारणा निर्माण करत असतात. त्याच पद्धतीने एखादा वाचक पुस्तकांच्या दुकानात शिरताच कुठल्या ग्रंथाकडे आकृष्ट होईल यामागे त्या ग्रंथाचं मुखपृष्ठ मोठी कामगिरी बजावत असतं किंवा ते निकृष्ट असेल तर ते हातात घेऊन चाळलंही जात नाही. झुंपा त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांच्या मुखपृष्ठांबाबत व्यक्त होताना काहीशी खंत व्यक्त करतात. त्यांनी रचलेल्या कथांपासून त्यांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे अर्थाच्या आधारे खूप दूर असल्याचं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे.अलिप्ततेची अशी भावना कुठल्याही लेखकासाठी वेदनादायी असू शकते. पुस्तक हे लेखकाच्या आंतरिक जगाची उत्पत्ती असली तरी मुखपृष्ठ हा इतरांनी निवडलेला बाह्य स्तर असतो आणि त्यामागे विक्री, दृष्टिकोन आणि आकर्षकता असे काही मापदंड असतात. लेखकाने एखादं नग्न अर्भक प्रकाशकाच्या हाती सोपवून टाकावं तशी ही अवस्था असते. प्रकाशक, मुखपृष्ठ चितारणारा कलावंत किंवा योजक ही मंडळी त्या ग्रंथाचं जणू भविष्यच लिहीत असतात. या व्यवहाराबाबतीत सखोल भूमिका मांडली असली तरीही आपल्या पुस्तकांची ‘वसने’ आपल्याला, आपल्या लेखनाला ओळखू शकणाऱया लोकांनी घडवावीत असं संवेदन या निबंधात व्यक्त होत राहतं.

हा दीर्घ आणि विचारशील निबंध वाचताना एखाद्या लेखकाची होणारी घालमेल समजून घेता येऊ शकते. प्रकाशनाच्या जगात ‘मुखपृष्ठ’ या विषयावर लेखक फारसं सुचवू शकत नाही असं दिसून येतं. याला अर्थातच काही सन्माननीय अपवाद असतीलही. पण लेखकाची भूमिका, लेखनाचा अर्क समजून घेत ग्रंथाला आंगडं, टोपडं घालणारे कलावंतही विरळ होत चाललेत आणि नावीन्याचा उत्साह म्हणून अनेकदा जुन्या ग्रंथांची देखणी प्रतिमाही बदलली जाते. त्यामुळे एखादा प्रसिद्ध ग्रंथ वाचक विकतही घेतो, पण त्याने नाक मुरडलेलं असतं. उदा. ‘मृत्युंजय’सारख्या अलौकिक कादंबरीचं नव्याने आलेलं मुखपृष्ठ आणि मूळ दीनानाथ दलाल यांनी चितारलेला सोनेरी मिश्यांचा बलदंड कर्ण आणि पार्श्वभूमीवर त्याचं सबंध आयुष्य यात दृष्टिकोनाचा मोठा फरक जाणवून येतो. त्यामुळे एखादं शक्तिशाली लेखन एखाद्या साच्यात कैद करायचं असल्यास ते मोठय़ा जबाबदारीचं काम होऊन बसतं याकडे लेखिका अंगुलीनिर्देश करते.

या सगळ्या चर्चेत झुंपा यांनी मुखपृष्ठाच्या संकल्पनेला कुठेही कमी लेखलेलं नाही, परंतु पुस्तकाचं बाह्य स्वरूप चुकलं की, आतल्या कथांचेही वाचकाने वेगळेच अर्थ घेण्याचा संभव असतो आणि त्यांची काळजी मुळात याबाबत अधिक आहे. एखादं देखणं मुखपृष्ठ वाचकाला निश्चितच आकर्षित करू शकतं. पुस्तकापर्यंत खेचून आणतं. वाचकांचा आणि पुस्तकाचा पहिला संबंध तिथेच तर प्रस्थापित होतो आणि त्यात स्थळ, काळ आणि वेळेप्रमाणे होणारे बदल, त्यामागची कारणं लेखिका नमूद करते. ही एक प्रकारे मुखपृष्ठाच्या जडणघडणीची आणि त्याच्या बऱया-वाईट प्रभावाची चर्चा आहे. मुखपृष्ठे महत्त्वाची असतातच, पण ती सुयोग्य पद्धतीने समजून उमजून निर्माण केली गेली तरच. कुठलेही तरुण/तरुणी आज ग्रंथदालनात शिरताच मुराकामीची पुस्तकं सहज शोधू शकतात याचं कारण म्हणजे साम्य राखून केलेली, परंतु अर्थाला चिकटून असणारी मुखपृष्ठे! …आणि झुंपा याहून वेगळं काय सांगतायत?

[email protected] (लेखक इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत.)