अभिप्राय – अंतर्मुख करणाऱ्या हृदयस्पर्शी आठवणी

>>प्रज्ञा पाटील

शिवसेना पक्षाचे उपनेते माजी आमदार श्री. रवींद्र  मिर्लेकर  यांच्या वडिलांनी लिहिलेल्या गजाननाची संघर्ष यात्रा एक प्रेरणादायी प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन  श्री. अशोक गजानन मिर्लेकर यांच्या हस्ते नुकतेच दक्षिण मुंबईत झाले. यावेळी झालेल्या  छोटेखानी  समारंभात मीर्लेकर कुटुंबीय आप्त  मित्रपरिवार आणि प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.

गजाननाची संघर्ष यात्रा या पुस्तकात स्वर्गीय गजानन नारायण मीर्लेकर यांनी आपल्या हृदयस्पर्शी आठवणी  जागविल्या  आहेत. मनस्वी व्यक्तिमत्व असलेल्या गजानन यांच्या लहानपणी वडिलांचे  छत्र हरविल्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षी घरी कोणी कमावते नसल्यामुळे गावी आईला सोडून  कामासाठी मुंबईला यावे लागले. इथे अत्यंत काबाडकष्ट करून दुसऱयाच्या घरात अनाथासारखे राहून गजानन यांनी सोनार काम शिकून घेतले. काम करून थोडे पैसे जमल्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षी भाडय़ाची  जागा घेतली. अत्यंत कष्टमय खडतर आयुष्याशी संघर्ष करत त्यांनी आईच्या संस्कारातून स्वतला सावरले. तत्त्वाशी व दिलेल्या शब्दासाठी इमान राखत त्याग  करण्याच्या प्रवृत्तीने प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून कोणाकडून काहीही न घेणे व कष्टातून कमविलेले धन इतरांना  सढळ  हस्ते देणे या प्रवृत्तीने आजीवन जगलेल्या  या सद्गुणी गजाननाच्या अंतर्मुख करणाऱया अनेक हृदयस्पर्शी आठवणी सदर पुस्तकात आहेत. त्या वाचून डोळे पाणावतात.

आपल्यासारख्या समदुःखी असणाऱया गावातील श्रमिकांना मुंबईला आणून त्यांचे आयुष्य  गजाननाने  मार्गी लावले. स्वअनुभवातून जीवनाचे अगाध तत्त्वज्ञान सांगणारा देश विदेशाच्या राजकारणावर भाष्य करणारा व जीवनाच्या संघर्षात ज्यांच्यावर आपण उपकार केले ते बेईमान झाल्यावर ईश्वरी चिंतनात जीवनाच्या अखेरपर्यंत तत्वाशी इमान राखून कठीण प्रसंगातही तावून सुलाखून कसे बाहेर पडायचे याचा महामंत्र या पुस्तकात दिला आहे.

घराण्याचा वारसा कुळाचार संस्कृती परंपरा व कर्तव्याचा परिपाठ सांगणाऱ्या गजाननाच्या आठवणी म्हणजे वर्तमान व भविष्यात सुखाने  जगण्याचा सार सांगणारी गीताच वाटते. तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी अशी रंजक आणि अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात असल्यामुळे ते अत्यंत वाचनीय झाले आहे.

गजाननाची संघर्षयात्रा – एक प्रेरणादायी प्रवास

लेखक ः गजानन मिर्लेकर

प्रकाशक ः गजानन मिर्लेकर, मुंबई

पृष्ठसंख्या ः 323