>>मंगेश दराडे
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता होर्डिंगच्या माध्यमातून मालामाल होणार आहे. प्राईम लोकेशनवर असलेल्या आपल्या जमिनीवर स्वतः होर्डिंग उभारण्याचा आणि सदरचे होर्डिंग जाहिरात कंपन्यांना भाडय़ाने देऊन त्यातून वर्षाकाठी सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांची कमाई करण्याचा म्हाडाचा विचार आहे. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडाने आपल्या जमिनीवरील होर्डिंगचे सर्वेक्षण केले. यात म्हाडाच्या जागेवरील 62 पैकी 60 होर्डिंगसाठी प्राधिकरणाची एनओसी घेतली नसल्याचे समोर आले. एनओसीशिवाय असलेले होर्डिंग म्हाडाच्या दृष्टीने बेकायदेशीर असले तरी पालिकेने संबंधित जाहिरात कंपन्यांना होर्डिंग उभारण्यासाठी परवाना दिल्यामुळे कारवाई करताना म्हाडाची गोची होत आहे. एनओसीशिवाय असलेले होर्डिंग अधिकृत केल्यास वर्षाला तब्बल 140 कोटी रुपये भाडय़ापोटी देऊ, असा प्रस्ताव अलीकडेच होर्डिंगधारकांनी म्हाडासमोर ठेवला आहे.
आपल्या जमिनीवर काही ठिकाणी स्वतःच होर्डिंग उभारून सदरचे होर्डिंग जाहिरात कंपन्यांना भाडय़ाने देता येतील का, याबाबत म्हाडाची चाचपणी सुरू आहे. असे झाल्यास म्हाडाला आस्थापनेचा खर्च भागवण्यासाठी वर्षाकाठी फिक्स इन्कम मिळण्यास मदत होणार आहे, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
असे ठरणार जागेचे भाडे
होर्डिंगसाठी जागा भाडय़ाने देताना रेडी रेकनरनुसार त्याचे दर ठरवले जात आहेत. होर्डिंगसाठी कमी जागा लागत असल्याने काही हजार रुपयांचे भाडे देऊन जाहिरात कंपन्या लाखो रुपयांची कमाई करतात. यापुढे होर्डिंगसाठी जागा भाडय़ाने देताना सदर होर्डिंगवर एका बाजूने जाहिरात डिस्प्ले केली जाते की दोन्ही बाजूने, त्यातून जाहिरात कंपन्यांना किती उत्पन्न मिळते हे विचारात घेऊन जागेचे भाडे ठरवले जाणार आहे, असेही अधिकाऱयाने सांगितले.
होर्डिंगसाठी लवकरच धोरण!
म्हाडा होर्डिंगबाबत लवकरच धोरण आणणार असून त्यासाठी समिती नेमली आहे. जागेचे भाडे किती आकारावे, नव्या होर्डिंगला परवानगी देताना अटी आणि शर्ती काय असाव्यात, ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय सध्या जे होर्डिंग उभे आहेत त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हे ठरवण्यास मदत होणार आहे. पॉलिसीचा ड्राफ्ट तयार झाला असून येत्या आठवडाभरात तो फायनल केला जाणार आहे.