अरेरे, घात झाला! 100 ग्रॅम वजनामुळे फोगाट अपात्र

उपांत्य फेरीतील धडाकेबाज विजयानंतर झुंजार कुस्तीपटू विनेश फोगाटचे सुवर्णपदक पक्के झाले होते. तिच्या विजयाचा जल्लोष मंगळवारी रात्री अवघ्या हिंदुस्थानात सणासारखा साजरा केला गेला. मात्र बुधवारी सकाळी सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी घात झाला. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशचे वजन 100 ग्रॅम अधिक झाल्यामुळे ती अपात्र ठरली आणि तिचे आणि अवघ्या देशाचे पदकाचे स्वप्न एका क्षणात मातीमोल झाले. तिची सुवर्णपदकाची लढत अमेरिकेच्या साराह हिल्डब्रांटशी होणार होती. विनेश अपात्र ठरल्यामुळे उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या क्युबाच्या लोपेझला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.

मंगळवारी रात्री विनेश फोगाटचं वजन तब्बल दोन किलो जास्त होतं असे वृत्त आहे. तिनं ते वजन कमी करण्यासाठी खूप मेहनतही घेतली. विनेश रात्रभर झोपली नाही. जेवलीही नाही.

वजन कमी करण्यासाठी तिनं सायकलिंग केली, स्किपिंग केली. एवढंच नव्हे तर तिने आपलं रक्तही काढलं, केस अन् नखंही कापले. याचबरोबर सॉना रूममध्येही (पाण्याच्या वाफेची रूम) ती प्रदीर्घ काळ बसली, मात्र एवढं सारं करूनही विनेशचं शंभर ग्रॅम वजन जास्तच भरलं. त्यामुळे तिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले.