‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या; कुस्ती क्षेत्रावर शोककळा

‘कुमार महाराष्ट्र केसरी’ किताब पटकवणारा सांगली जिल्ह्यातील तरुण पैलवान सूरज निकमने (30) आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुस्तीच्या आखाडय़ात अनेकांना चितपट करून अस्मान दाखवणाऱया सुरजने अशा पध्दतीने जीवन संपवल्याने कुस्ती क्षेत्राला मोठा धक्का बसला असून शोककळा पसरली आहे.

सांगली जिल्हय़ातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील पैलवान सूरज निकमने अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. कुस्तीच्या आखाडय़ात अनेकांना अस्मान दाखवले होते. गेल्या वर्षी झालेल्या ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत मानाची गदा पटकवली होती. शुक्रवारी सायंकाळी सूरजने घरात गळफास घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्याचे मामा भास्कर जोतीराम जाधव यांनी त्याला विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काही दिवसांपूर्वी पैलवान सूरजच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून तो व्यथित होता. तसेच अवघ्या दीड महिन्यापूर्वी सूरज निकमचा विवाह झाला होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करत आहेत. उद्या 29 जूनला सूरजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.