पखवाजला जगभरात मानाचे स्थान मिळवून देणारे प्रसिद्ध पखवाज वादक पं. भवानीशंकर यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दरम्यान, पं. भवानीशंकर यांच्या पार्थिवावर उद्या, रविवारी दुपारी बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पं. भवानी शंकर यांच्या सात पिढय़ा संगीत क्षेत्रात होत्या. वयाच्या आठव्या वर्षी वडील आणि गुरू पं. बाबूलाल यांच्याकडून त्यांनी पखवाज व तबलावादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. 12 प्रकारची वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी कानपूरला पहिला कॉन्सर्ट केला. पुढे त्यांनी बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा, तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन, पं. अनिंदो चटर्जी यांच्यासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, आर. डी. बर्मन आदी संगीत क्षेत्रातील दिग्गजांसोबत काम केले. ‘शोले’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘खुदा गवाह’, ‘खलनायक’, ‘नमक हलाल’, ‘नाचे मयूरी’ आदी चित्रपटांसाठी त्यांनी तबला आणि पखवाज वादन केले. ‘रामायण’, ‘महाभारत’ मालिकेत पार्श्वसंगीतातील पखवाजाचे वादन त्यांनीच केले होते. पखवाज केवळ भजन, कीर्तन पुरते मर्यादित न ठेवता शास्त्राrय, उपशास्त्राrय, फ्युजन, बॉलिवूडमध्ये अप्रतिम आणि सुलभरित्या वाजवून जगभरात पखवाजला वेगळे स्थान मिळवून दिले. 2004 साली त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते.
चिपळूणला 25 तारखेला आम्ही एकत्र कॉन्सर्ट केला आणि आज ही धक्कादायक बातमी कानावर आली. गेल्या चाळीस वर्षांपासून आमची मैत्री होती. प्रेमाने मी त्यांना भाईजी म्हणायचो. अनेक कार्यक्रम आम्ही एकत्र केले. मानधनाची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. पखवाज वादनातून मिळणारे समाधान आणि प्रेक्षकांच्या चेहऱयावरील आनंद माझ्यासाठी मोलाचा आहे, असे ते म्हणायचे. तबल्याच्या ग्लॅमरमध्ये हरवलेल्या पखवाजला जगभरात प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवले. त्यांच्या जाण्यामुळे संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
पखवाजमधील दिग्गज व्यक्तिमत्त्व आज हरपले. गेल्या 15 वर्षांपासून आमच्या बासरी उत्सवात त्यांचा हमखास सहभाग असायचा. पुढच्या महिन्यात होणाऱया उत्सवातदेखील ते सहभागी होणार होते. इतके दिग्गज कलाकार असूनही ते डाऊन टू अर्थ होते. त्यांचा सहभाग इतर कलाकारांचा उत्साह वाढवणारा असायचा. आमच्यासारख्या कलाकारांसाठी ते आदर्शवत होते.