गोखले पुलावर तेराशे टनाचा गर्डर

अंधेरी पूर्व-पश्चिमला जोडणारा गोखले पुलाचा 1300 टन वजनाचा पहिला गर्डर बसवण्याचे काम आज मध्यरात्री सुरू करण्यात आले. प्रचंड आणि 7.5 मीटर उंचीवर हा गर्डर खाली उतरवण्याचा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. गर्डर बसवल्यानंतर पुलाची एक बाजू फेब्रुवारीपासून सुरू करण्यासाठी वेगाने काम करण्यात येणार असे पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आले.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले पूल 1975 मध्ये बांधला आहे. या पुलाचा काही भाग 3 जुलै 2018 मध्ये कोसळून दोघांचा मृत्यू झाल्यामुळे या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. नोव्हेंबर 2022 पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. मात्र हा पूल बंद झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंधेरीसह सांताक्रुझ ते जोगेश्वरी या भागात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा पूल वेगाने पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱया राईट्स पंपनीच्या माध्यमातून गर्डर बसवण्याचे काम केले जात आहे. पुलाच्या एकूण कामातील 80 टक्क्यांहून काम याआधीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे दुसरा गर्डर बसवून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पूल सुरू होईल.