गतवर्षी ऑस्ट्रेलियन महिलांनी दक्षिण आफ्रिकन महिला संघाचे त्यांच्या घरातच जगज्जेतेपदाचे स्वप्न उदध्वस्त केले होते. आज दक्षिण आफ्रिकेने आपला गेल्या पराभवाचा बदला घेताना आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियन महिला संघाचा काटाच काढला. दक्षिण आफ्रिकन संघाने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत 16 चेंडू आणि 8 विकेटनी धुक्वा उडवला आणि सलग दुसऱयांदा जगज्जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले. आता त्यांची लढत वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाविरुद्ध रविवारी खेळविली जाईल.
आज उपांत्य लढतीपूर्वी साऱयांनाच एक प्रश्न पडला होता, तो म्हणजे वचपा की पुनरावृत्ती. पण दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी सहावेळा जगज्जेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला 135 धावांत रोखण्याचा यशस्वी प्रयत्न करत आपल्या विजयाच्या आशा उंचावल्या. त्यानंतर अ?@नेक बॉशने कर्णधार लॉरा वॉलवार्ड्टबरोबर 96 धावांची खणखणीत आणि वेगवान भागी रचत दक्षिण आफ्रिकेचा विजय पक्का केला. वॉलवार्ड्टने आजही कर्णधाराला साजेशी खेळी करताना 42 धावा ठोकल्या तर बॉशने ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर बॉसगिरी दाखवताना 48 चेंडूंत नाबाद 74 धावा चोपून काढल्या. तिच्या या झंझावातामुळे आफ्रिकेने 18 व्या षटकांत आपल्या संस्मरणीय विजयावर शिक्कामोर्तब केले. तीच दक्षिण आफ्रिकेचे मॅचविनर ठरली. ऑस्ट्रेलियाच्या अ?@नाबेल सदरलॅण्डने 26 धावांत दोन्ही विकेट टिपल्या. परवा वेस्ट इंडीजच्या सनसनाटी विजयामुळेच दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचली होती आणि आज त्यांनी त्या संधीचे सोने करत दुसऱया अंतिम फेरी गाठली.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने बेथ मूनी (44), ताहिला मॅकग्रा (27) आणि एलिस पेरी (31) यांच्या खेळीमुळे 5 बाद 134 अशी मजल मारली होती. दक्षिण आफ्रिकेच्या मॅरीझेन काप, अयाबोंगा खाका आणि नोनकुलुलेको लाबा यांच्या अचूक माऱयामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दीडशेचा टप्पा ओलांडता आला नाही आणि त्यांचा संघ 134 पर्यंतच पोचला.
ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीची मालिका खंडित
महिला टी-20 च्या 2009 साली खेळल्या गेलेल्या पहिल्यावहिल्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन महिला उपांत्य फेरीतच हरल्या होत्या. त्यानंतर सलग सात स्पर्धांच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघाने धडक मारली आणि सहावेळा जगज्जेतेपदही पटकावले. त्याने 2010, 2012 आणि 2014 या तिन्ही स्पर्धांमध्ये जगज्जेतेपद पटकावत हॅटट्रिक साधली. त्यानंतर 2016 साली वेस्ट इंडीजने त्यांचा पराभव करत जगज्जेतेपद त्यांच्याकडून हिसकावून घेतले होते. त्यानंतर पुन्हा जगज्जेतेपदाची हॅटट्रिक करताना त्यांनी 2018, 2020 आणि 2023 या तिन्ही स्पर्धा जिंकल्या. साखळीत विजयाचा चौकार ठोकत अपराजित असलेली असलेली ऑस्ट्रेलियन महिला टीम जगज्जेतेपदाचा चौकार ठोकण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरली. सलग सात अंतिम फेरी खेळल्यानंतर महिला क्रिकेटवर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला उपांत्य फेरीतच पराभवाचा धक्का सोसावा लागला.