नफा कमवायला आली अन् तुरुंगात गेली

केनया येथून सोने घेऊन हिंदुस्थानातील मार्केटमध्ये विक्री करून नफा कमवण्याच्या नादात महिलेला तुरुंगात जावे लागले आहे. नजमा शेख असे महिलेचे नाव आहे. तिच्याकडून एक कोटी 58 लाखांचे सोने जप्त केले आहे. नैरोबी येथून एक महिला सोने घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. हवाई गुप्तचर विभागाने विमानतळावर सापळा रचला. आज सकाळी नजमा ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱयाने ताब्यात घेतले. झडतीत तिच्याकडून 1 कोटी 58 लाख 15 हजार रुपयांचे सोने जप्त केले. नजमा ही मूळची केनियाची रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी नजमाने नैरोबी येथून एका महिलेकडून ते उधारीवर सोने घेतले होते. उधारीवर घेतलेले ते सोने ती हिंदुस्थानात विक्री करणार होती.