पश्चिम बंगालमध्ये महिलेवर बलात्कार करून कीटकनाशक पाजले; स्थानिक महिलांनी आरोपीला विवस्त्र करून मारले

पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यात शनिवारी 10 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत संतप्त स्थानिकांनी पोलीस चौकी पेटवून दिली. या घटनेला 24 तासही उलटत नाहीत तोवर पूर्व मेदीनीपूर येथील भूपतीनगरमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. तिला कीटकनाशक पाजून ठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्यानंतर स्थानिक महिलांनी या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आणि आरोपीच्या घरावर हल्ला करत त्याला काठ्यांनी जबर मारहाण केली.

रविवारी सकाळी बलात्कारपीडित महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी वेगाने पसरताच स्थानिक लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आणि स्थानिक महिलांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला. आरोपीला पकडून फरफटत रस्त्यावर नेले आणि काठ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. याबाबत कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीची महिलांपासून सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त जमावाने शनिवारी महिस्मरी पोलीस चौकी पेटवून दिली आणि पोलिसांवर दगडफेक केली होती.

पीडितेच्या अंगावर नव्हते कपडे

बलात्कार पीडितेच्या मुलाने आईच्या चेहऱ्यावर कापड बांधल्याचा दावा केला आहे. आरोपींनी तिला घराच्या मागे नेले होते. घटनेची माहिती मिळताच आईच्या अंगावर एकही कपडा नसल्याचे मी पाहिजे. तोंडातून फेसही येत होता, असे त्याने पोलिसांना सांगितले.

लोकांचा पोलिसांना घेराव घालून निदर्शने

आज दिवसभर परिसरात प्रचंड तणाव होता. परिस्थिती तणावपूर्णच असून बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर जमावाने पोलिसांना घेराव घातला आणि आंदोलन सुरू केले. त्यामुळे भूपतीनगरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून या घटनेतील आरोपींना अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.