एखाद्या महिलेचा पाठलाग करणे, शिवीगाळ करणे वा धक्का देणे हे चीड आणणारे कृत्य असू शकते. मात्र हे कृत्य विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. 36 वर्षीय मजुराला कनिष्ठ न्यायालयाने विनयभंगाच्या आरोपाखाली दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयाने ती शिक्षा रद्द करीत आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला.
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱया तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मजुराविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीने दोनवेळा पाठलाग केला आणि अत्याचार केला. एकदा बाजारात जात असताना सायकलवरून पाठलाग करून ढकलले, असे तरुणीने पोलीस तक्रारीत म्हटले होते.
न्यायालयाचे मत
आरोपीने तरुणीला अयोग्यरीत्या स्पर्श केला, ज्यामुळे तिची स्थिती लाजीरवाणी झाली, असे या प्रकरणात दिसत नाही. केवळ सायकलवरून आलेल्या आरोपीने तिला धक्का दिला. हे कृत्य महिलेच्या सभ्यतेच्या भावनेला धक्का देणारे नाही. त्यामुळे हे कृत्य भारतीय दंड विधान कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.