मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक भीषण घटना घडली आहे. महाकालेश्वर मंदिराच्या फूड सेंटरमध्ये बटाटे सोलण्याच्या मशिनमध्ये ओढणी अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. रजनी खत्री असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिलेच्या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत करणार असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) लक्ष्मी नारायण गर्ग यांनी सांगितले.
महाकालेश्वर मंदिराच्या फूड सेंटरमधील स्वयंपाकघरात पीडित रजनी काम करत होती. शनिवारी नेहमीप्रमाणे काम करत असताना रजनीच्या गळ्यातील ओढणी बटाटा सोलण्याच्या मशिनमध्ये अडकली. यामुळे तिचा गळा आवळला गेला. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रजनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.