पदभरतीच्या मागणीसाठी सावित्रीच्या लेकी उपोषणावर

राज्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. या पदांवर भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलवर केवळ स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप पदभरतीची जाहिरात आणि प्राधान्यक्रम उपलब्ध झालेले नाहीत. पवित्र पोर्टलच्या या धीम्या कारभाराविरोधात टीईटी पात्र आणि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषण सुरू आहे. लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करून एकाच टप्प्यात पदभरती आणि प्रतीक्षा यादी लावण्याची मागणी या उपोषणकर्त्यांची आहे.

पदभरतीच्या मागणीसाठी शिक्षिका बनू इच्छिणाऱया अनेक महिला उमेदवारांनी उपोषण सुरू केले आहे. डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदावर भरती करण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे नोटीफिकेशन 31 जानेवारी रोजी काढण्यात आले. प्रत्यक्ष परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान पार पडली. त्यानंतर तब्बल नऊ महिने होऊन गेले तरी फक्त स्वप्रमाणपत्र भरण्याची कार्यवाही सुरू आहे. शिक्षक भरतीसाठी निवड प्रक्रिया राबविताना प्रतीक्षा यादी लावण्यात यावी, जेणेकरून जागा रिक्त राहणार नाही व गुणवत्ताधारकांवर अन्याय होणार नाही, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळा
शिक्षक – 65 हजार 111
शिक्षकेतर कर्मचारी- 2 हजार 644
एकूण रिक्त पदे -67 हजार 555

रिक्त पदांच्या 80 टक्के पदे बिंदुनामावलीप्रमाणे भरण्याकरिता पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक उपलब्ध करण्यात येतील. त्यानुसार राज्यातील 80 टक्के पदे एकाच टप्प्यात गुणवत्तेनुसार भरण्याची मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने केली आहे.