लाडक्या बहिणीचा देवा‘भाऊ’च्या कार्यालयावर हल्ला, मंत्रालयात घुसून तोडफोड

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर एका महिलेने हल्ला केला. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास लाडक्या बहिणेने थेट मंत्रालयात घुसून देवा‘भाऊ’च्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयाबाहेर असलेली फडणवीसांच्या नावाची पाटी तसेच त्या ठिकाणी असलेल्या झाडांच्या कुंडय़ांची तोडफोड केली. या घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, हल्ला करणारी महिला ही मनोरुग्ण असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयावर एका महिलेने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. ही महिला फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत कशी पोहोचली? तोडपह्ड करत असतानाही पोलिसांनी तिला का पकडले नाही? मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलीस कर्मचारी काय करत होते? असे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत हल्ला करणाऱ्या महिलेचा ठावठिकाणा शोधून काढला.

सदर महिलेच्या वडिलांनीही तिच्याविरोधात एकदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. ती अविवाहित असून तिने घरच्यांनाही त्रास दिला होता. तिला कंटाळून सर्व कुटुंबीय वेगळे राहतात. संबंधित महिला यापूर्वीसुद्धा मंत्रालयात अनेकदा आली होती. मला सलमान खानचा फोन नंबर द्या, लग्न करायचे आहे, अशी मागणी ती करत असते. अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करून सलमानचा नंबर मागते, ही महिला भाजप समर्थक असल्याची माहितीही पुढे आली आहे.

मंत्रालयातील पोलिसांवर कारवाई होणार?

सचिव गेटने ही महिला पास न घेता मंत्रालयात शिरली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस नेहमी तैनात असतात. मग या वेळी पोलीस का उपस्थित नव्हते? असे प्रश्न उपस्थित केले जात असून संबंधित ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हल्लेखोर महिलेची ओळख पटली

मंत्रालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देवाभाऊंच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या लाडकी बहिणीचा ठावठिकाणा पोलिसांनी शोधून काढला. ही महिला दादर येथे राहते. धनश्री सहस्रबुद्धे असे तीचे नाव असून ती मनोरुग्ण असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.

त्या महिलेची व्यथा समजून घेऊ – फडणवीस

त्या महिलेने कार्यालयाचे नुकसान का केले? तिचे म्हणणे नेमके काय होते? उद्विग्नतेच्या भावनेने त्या महिलेने कार्यालयाचे नुकसान केले का? त्या महिलेची व्यथा काही आहे का? कोणी जाणीवपूर्वक पाठवलेय का? हे आम्ही निश्चितपणे समजून घेऊ, असे फडणवीस म्हणाले.

हल्लेखोर महिलेने मंत्रालयाची कडेकोट सुरक्षा भेदून सहावा मजला गाठला. गृहमंत्री फडणवीस यांचंच कार्यालय सुरक्षित नसेल, तर जनतेच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.