कमळाबाईने गंडवले, मिंधे नाराज, दादा पुन्हा दिल्ली दरबारी!

महायुतीत जागावाटपाच्या चर्चेचे गुऱहाळ सुरू असतानाच भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत मित्र पक्षांना गंडवले. कमळाबाईने परस्पर यादी जाहीर केल्याने मिंधे गटात कमालीची अस्वस्थता पसरली असून सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. महायुतीत समाधानकारक जागा मिळत नसल्याने अजितदादांनी राज्यातील नेत्यांशी चर्चा करण्याचे टाळून थेट दिल्ली गाठली आहे.

लोकसभेचे जागावाटप करताना भाजपने निवडणुकीआधी केलेल्या सर्व्हेचा आधार घेत सर्वाधिक जागा पदारात पाडून घेतल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला वरचढ होऊ द्यायचे नाही, अशी भूमिका मिंधे आणि अजितदादा गटाने घेतली होती. जागावाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू होताच भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. पण, जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच भाजपने त्यांच्या वाटय़ाच्या निम्म्याहून अधिक उमेदवारांची यादी जाहीर करत मिंधे आणि अजित पवार गटाला धक्का दिला.

महायुतीच्या घटक पक्षांशी चर्चा न करताच भाजपने यादी जाहीर केली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. कायदा हातात घेणाऱ्यांना उमेदवारी देणे कितपत योग्य आहे? विरोधकांना आयते मुद्दे मिळतील असे उमेदवार नको. पक्षात इनकमिंग झालेल्या उमेदवारांच्या ऐवजी पक्षासाठी झटणाऱया स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.

कल्याण पूर्वमध्ये विश्वासघात

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे शहर प्रमुख महेश शिंदे यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या गुह्यात गणपत गायकवाड जेलमध्ये असताना मिंधे गटाचा विरोध डावलून भाजपने त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देऊन महायुतीच्या घटक पक्षाशी विश्वासघात केला. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.

भाजपने मिंधे गटाच्या जागांवर दिले उमेदवार

महायुती म्हणून यापुर्वी शिवसेनेने लढविलेल्या विधानसभेच्या जागांवर मिंधे गटाने दावा सांगितलेला आहे. त्यानंतरही भाजपने धुळे, अचलपुर, उरण, नालासोपारा, देवळी या जागांवर परस्पर उमेदवार दिल्याने मिंधे गटात नाराजी आहे.

अजित पवार गटाला हव्यात 60 पेक्षा अधिक जागा

मिंधे गटाच्या वाट्याला 85 येण्याची शक्यता आहे. 60 जागांची यादी एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. उर्वरीत 25 जागांबाबत त्यांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चाही केली. यावेळी अजित पवार उपस्थितीत नव्हते. अजित पवार गटाने 60 पेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी लावून धरली आहे. पण, राज्यातील भाजप नेते दाद देत नसल्याने अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या ठाणे जिल्ह्यातील घुसखोरीने मिंधे गटात अस्वस्थता

ठाणे जिल्ह्यात एकूण नऊ जागा लढविण्याची तयारी भाजपने केली आहे. कळवा-मुंब्रा, भिवंडी पूर्व आणि शहापूरच्या जागांवर अजितदादा गटाने दावा सांगितला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाच्या वाटयाला फक्त सहा जागाच येणार असल्याने मिंधे गटात कमालीची अस्वस्थता आहे. उल्हासनगरची एकमेव जागा वगळता कल्याण पूर्व, डोंबिवली, भिवंडी पश्चिम, ठाणे, मुरबाड, ऐरोली, बेलापूर या ठिकाणचे उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. मीरा-भाईंदरची जागाही भाजपच लढविण्याची शक्यता आहे.