राज्यात खांदेपालट होणार? खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता

eknath shinde devendra fadnavis ajit pawar

लोकसभा निवडणुकीत भाजपची चांगलीच घरसण झाल्याचं पाहायला मिळत असून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीनं देशातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रात भाजप अवघ्या 9 जागांवर पोहोचलं आहे तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात आता पुन्हा काही बदल पाहण्याची शक्यता असून ज्या मतदारसंघात पराभव झाला आहे, अशा भागातून येणाऱ्या मंत्र्यांना खराब कामगिरी दाखवून डच्चू देण्याचा भाजपचा मानस आहे. यामुळे भाजपसोबत गेलेले एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या मंत्र्यांवर टांगती तलवार आहे.

नरेंद्र मोदी यांनी NDA च्या जोरावर तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पाडण्यात येणार असं बोललं जात आहे.

2 जुलै 2023 रोजी अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारसोबत सहभागी झाले होते. त्यावेळी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजितदादांच्या गटातील नेत्यांना मोठ्याप्रमाणावर संधी मिळाली होती. आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तारावर बोललं जात आहे. मात्र विस्तारपेक्षा चर्चा आहे ती खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळणार याची. त्यामुळे लोकसभेत ज्या मतदार संघात कामगिरी खराब झाली आहे अशा भागातील मंत्र्यांना डच्चू मिळणार की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे. यामध्ये नक्की काय होणार याबद्दल अद्याप सरकारच्या कुण्या मंत्र्याकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाही.

भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही काळापासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील अशीही चर्च आहे.