वेब न्यूज – व्हेल माशाचा पराक्रम

माशांच्या अनेक प्रजाती आहेत. फिश टँकमध्ये पाळल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी छोट्या माशांपासून ते स्वोर्ड फिशपर्यंत अनेक मासे हे सामान्य लोकांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत अनेकांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय असतात. या अनेक प्रजातींपैकी व्हेल मासा हा त्याच्या अंगभूत कौशल्यामुळे आगळा वेगळा मानला जातो. अनेक यशस्वी चित्रपटांच्या कथेमध्ये व्हेल माशाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. चक्क फक्त व्हेल माशावर आधारलेल्या चित्रपटांनीदेखील भक्कम गल्ला जमवलेला आहे. काही देश या माशांचा वापर समुद्रातील हेरगिरीसाठी करतात, असा आरोपदेखील अनेकदा करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या खास अभ्यासाचा विषय असलेल्या या माशाच्या प्रजातीपैकी एका नर व्हेलने सध्या जगभरातील प्राणी तज्ञांना थक्क करून सोडले आहे.

मादीच्या शोधात हिंडत असलेल्या या नर व्हेलने तब्बल पॅसेफिक महासागरापासून ते हिंद महासागरापर्यंत 13046 किलोमीटर अंतराचा प्रवास पार पाडला आहे. योग्य मादीच्या शोधात या नर व्हेलने तीन महासागर ओलांडण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. योग्य जोडीदाराच्या शोधात व्हेल माशाने लांबवर प्रवास करणे, यात विशेष असे काही नाही. पण इतक्या प्रचंड लांबीचा प्रवास हा शास्त्रज्ञांना आवाक् करून गेला आहे. यापूर्वी 1999 ते 2001 या कालावधीत एका हंपबॅक प्रजातीच्या मादी व्हेलने ब्राझील ते मादागास्कर असे 9800 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापले होते, जो आजवरचा विक्रम होता, तिचा हा विक्रम मोडणारा नर व्हेलदेखील हंपबॅक प्रजातीचा आहे.

योग्य मादीच्या शोधात हा नर व्हेल प्रथम कोलंबियापासून पूर्व दिशेकडे गेला. त्यानंतर तो दक्षिण दिशेच्या समुद्राकडे वळला. अटलांटिक समुद्रात त्याने बराच काळ तेथील मादी व्हेलना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यावर त्याने पुन्हा आपली दिशा बदलली आणि हिंद महासागराच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. व्हेलचा समुद्रातील प्रवास हा एक खास पद्धतीने होत असतो. व्हेल साधारण दरवर्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे 8000 किलोमीटर अंतराचा प्रवास करू शकतात.

स्पायडरमॅन