ईडीचे अधिकारी घरात घुसले, महिलेचा विनयभंग केला; पश्चिम बंगाल पोलिसांचा हिसका, धाडी टाकणाऱ्या पथकाविरुद्ध गुन्हा दाखल

पश्चिम बंगालमधील कथित रेशन घोटाळ्याप्रकरणी 24 परगणा जिह्यातील संदेशखळी गावात जाऊन धाडी टाकणे ईडीच्या अधिकाऱयांना चांगलेच महागात पडले आहे. या ईडी अधिकाऱयांविरोधात घरात घुसून एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून घुसखोरी आणि महिलेचा विनयभंगाचा प्रयत्न या आरोपाखाली पश्चिम बंगाल पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ईडीचे अधिकारी शुक्रवारी कथित रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमुल काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शाहजहाँ शेख यांच्या घराची झडती घेण्यासाठी जात होते. ईडी अधिकाऱयांनी गावात पाय ठेवल्याबरोबर त्यांना हजारो गावकऱयांच्या रोषाचा सामना करावा लागला. हजार जणांच्या जमावाने ईडी पथकावर दगडफेक केली आणि अधिकाऱयांना फरफटत नेऊन बेदम मारहाण केली. त्यात काही अधिकाऱयांची डोकी फुटली आणि ईडी अधिकाऱयांना हात हलवत परत माघारी फीरावे लागले. या हल्ल्याच्या दुसऱया दिवशी शनिवारी पोलिसांनी याप्रकरणी तीन गुन्हे नोंदवले. ईडीच्या अधिकाऱयांविरोधात एक गुन्हा तर दोन अज्ञात लोकांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. शेख यांच्या घराच्या केअरटेकरच्या तक्रारीच्या आधारे ईडीच्या अधिकाऱयांविरोधात आयपीसी कलम 441 (गुन्हेगारी घुसखोरी), 379 (चोरी करण्याचा हेतू) आणि 354 (महिलेचा विनयभंग) याअंतर्गत ईडीच्या अधिकाऱयांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

शाहजहान शेख यांचे दहशतवाद्यांशी कनेक्शन?
ईडीच्या अधिकाऱयांवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेले तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेख हे देशाच्या सीमेपलीकडे गेले असण्याची शक्यता पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांनी व्यक्त केली आहे. त्यांना तातडीने अटक करा आणि त्यांचे दहशतवाद्यांशी कनेक्शन आहे का ते तपासा, अशा सूचनाही त्यांनी पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना केल्या आहेत. काही पोलीस अधिकारी शेख यांना पाठीशी घालत असून काही राजकीय नेत्यांचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याची तक्रार राज भवन येथे प्राप्त झाली. त्यानंतर राज्यपालांनी शेख यांना तातडीने अटक करण्याची सूचना केल्याचे वृत्त आहे.

केरळचे माजी मंत्री इसाक यांना ईडीची पुन्हा नोटीस
केरळचे माजी अर्थ मंत्री थॉमस इसाक यांना ईडीने केआयआयएफबीमधील आर्थिक व्यवहारात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी परकीय चलन व्यवस्थापनाशी निगडित प्रकरणात पुन्हा नोटीस बजावली आहे. ईडीने त्यांना 12 जानेवारी रोजी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ईडीने डिसेंबरमध्ये केरळ उच्च न्यायालयाला सांगितले होते की, थॉमस इसाक यांना बजावलेली नोटीस परत घेतली आहे. थॉमस इसाक आणि केआयआयएफबीच्या एका अधिकाऱयाच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान ईडीने नोटीस परत घेतल्याचे सांगितले होते. ईडीकडून नोटिशीद्वारे केवळ व्यक्तिगत माहिती मागण्यात आली होती. त्यामुळे ही नोटीस रद्द करण्याची मागणी इसाक आणि संबंधित अधिकाऱयाने याचिकेद्वारे केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली होती, मात्र ईडी स्वतंत्रपणे तपास करू शकते, असेही स्पष्ट केले होते.

ईडी म्हणजे इडियट
ईडी अधिकाऱयांवर कारवाई होत असताना पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ईडीला इडियट म्हटले आहे. टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्याविरोधात ईडीने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. मात्र, अशाप्रकारे लुकआऊट नोटीस जारी करून काय करणार? ईडी स्वत इडियट आहे, असा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.