गेली 30 वर्ष अजित पवार यांनी नेतृत्व केलं आता नवीन नेतृत्व तयार केले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. तसेच आयुष्यात मी 14 निवडणुका लढलो पण जनेतेने मला एकदाही घरी पाठवलं नाही असेही पवार म्हणाले.
बारामतीत एका सभेत बोलताना पवार म्हणाले की, राज्य हे नीट चाललं पाहिजे, राज्याच्या चेहरा बदलला पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. आणि त्यासाठी नवीन पिढी तयार केली पाहिजे. बारामतीत युगेंद्र पवार यांना आम्ही संधी दिली आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी अनेक तरुण आम्ही राष्ट्रवादीकडून उभे केले आहेत. महाविकास आघाडीने तरुण नेतृत्वाची फळी उभी करण्याचे ठरवले आहे, त्यासाठी जनतेची मदत हवी आहे असे आवाहन पवार यांनी केले.
1967 साली मी पहिल्यांदा निवडणूक लढवली. पहिली 30 वर्ष मी नेतृत्व केलं. त्यानंतर पुढची 30 वर्ष अजित पवारांनी नेतृ्त्व केलं. आता पुढच्या 30 वर्षांचे नेतृत्व घडवायचे आहे. आताच्या राज्यकर्त्यांचे जनतेकडे लक्ष नाही असे माझे स्पष्ट मत आहे. मी सत्तेत नाही, राज्यसभेत आहे आणि माझ्याकडे अजून दीड वर्ष आहे. दीड वर्षाच्या नंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचाही विचार मला करावा लागेल. लोकसभा निवडणूक मी लढवणार नाही, लोकसभाच नाही तर कुठलीही निवडणूक लढवणार नाही. आतापर्यंत मी 14 निवडणुका लढवल्या. आणि तुम्ही मला एकदाही घरी पाठवलं नाही, दरवेळी निवडूनच देता. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे आणि नवीन पिढी आणली पाहिजे हे सुत्र घेऊन मी कामाला लागलो आहे, याचा अर्थ समाजकारण सोडलेलं नाही, सत्ता नको. पण लोकांची सेवा, लोकांच काम हे मात्र करत रहायचं असेही पवार म्हणाले.