राज्यसभेत खोटं बोलणाऱ्या अमित शहांवर कारवाई करा; जयराम रमेश यांची मागणी

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विशेषाधिकार उल्लंघनाची कार्यवाही करावी, अशी मागणी जयराम रमेश यांनी पत्रातून केली आहे. राज्यसभेची प्रक्रिया आणि कामकाजानुसार नियम 187 अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात विशेषाधिकार उल्लंघनाची कार्यवाही करावी, असे जयराम रमेश यांनी सभापती जगदीप धनखड यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 जुलैला केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलन दुर्घटनेवर सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. दुर्घटनेपूर्वी केरळ सरकारला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तरीही केरळ सरकारने खबरदारी घेतली नाही, असे अमित शहा म्हणाले होते. 23 जुलैला केंद्र सरकारने केरळ सरकारला अलर्ट जारी केला होता. पण त्याकडे केरळ सरकारने दुर्लक्ष केले. वायनाड भूस्खलन दुर्घटनेला केरळ सरकार जबाबदार असल्याचे अमित शहा म्हणाले होते.

काय म्हणाले जयराम रमेश?

अमित शहा यांच्या दाव्यानंतर माध्यमांमधून तथ्यांची पडताळणी करण्यात आली. 2 ऑगस्ट 2024 च्या म्हणजे आजच्या ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात एक फॅक्ट चेक रिपोर्ट देण्यात आला आहे. या आधारावर केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला होता, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य राज्यसभेची दिशाभूल करणारे आहे. आणि पूर्णपणे खोटे आहे, असे जयराम रमेश यांनी म्हणाले.

एखाद्या मंत्र्याने किंवा सदस्याने दिशाभूल केल्यास विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आणि आवमान केल्याचे समजले जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात विशेषाधिकाराचे उल्लंघन केल्याची कार्यवाही सुरू करावी, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.