वारली कला; भौमितिक आकारातून कलानिर्मिती

>>प्रतिभा वाघ

वारली चित्रांवर निसर्गमातेचा अमीट प्रभाव दिसतो. दैनंदिन जीवन, शिकार दृश्ये, मासेमारी, शेती, लोककथा असे चित्रविषय वारली चित्रकलेचे आहेत. वारली चित्रकला परंपरा विविध पातळीवर जोपासण्याचे काम वारली समाजातील अनेकांकडून घडत आहे. यात पुढची पिढीही मागे नाही. वारली चित्रकार हरेश्वर वनगा वारली बोलीभाषा आणि चित्रशैली जतन व्हावी, आदिवासींचे रीतिरिवाज, परंपरा, संस्कार या ठेव्याचे दस्तऐवजीकरण व्हावे यासाठी तळमळीने काम करीत आहेत.

मला अजिबात चित्र काढता येत नाही असे म्हणणारा प्रत्येकजण डोंगर, सूर्य, झोपडी, नदी, आकाशात उडणारे पक्षी आणि झाड तर नक्कीच काढतो, पण हे झाड रेखाटताना आपण शहरी लोक बुंधा वरून खालच्या दिशेने चित्रीत करतो. पण वारली चित्रकारांची निरीक्षण क्षमता आपल्या सुशिक्षित (?) शहरवासीयांना नवी दिशा दाखवते. भीमबेटका येथील शैलचित्रांशी साम्य दर्शविणारी वारली चित्रकला महाराष्ट्राची लोकचित्रकला आहे.

‘वारल’ म्हणजे जमिनीचा तुकडा. त्यावर उपजीविका करणारे ते वारली म्हणून ओळखले जातात. निसर्ग म्हणजे सर्वदायिनी माता आहे, न संपणारा ठेवा आहे. वारली चित्रांवर या निसर्गमातेचा अमीट प्रभाव दिसतो. दैनंदिन जीवन, शिकार दृश्ये, मासेमारी, शेती, लोककथा असे चित्रविषय वारली चित्रकलेचे आहेत. चित्रातील आकारांचे निसर्गातील आकारांशी साम्य आहे. जसे वर्तुळ हे सूर्य-चंद्राचा आकार, त्रिकोण हा डोंगर, टोकेरी आकाराचे झाड, तर चौकोन हा शेतजमिनीच्या तुकडय़ाशी नाते सांगतो. चित्रात दोन समद्विभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू उभ्या रेषेत जोडून त्यावर वर्तुळ आणि काडय़ांसारखे हातपाय म्हणजे मनुष्याकृती बनते. स्त्राr आणि पुरुषांच्या आकृतीत स्त्रियांचा ओटीपोटाचा त्रिकोण हा धडाच्या त्रिकोणापेक्षा रंद असतो आणि स्त्रियांना डोक्याच्या एका बाजूला केसांचा अंबाडा दर्शविण्यासाठी छोटे वर्तुळ जोडलेले असते. पुरुषांच्या आकृतीत धडाचा त्रिकोण रंद असतो.

महाराष्ट्रात नाशिक, धुळे, ठाणे जिल्हय़ांतील पालघर, तलासरी, केंद्रशासित दादरा, नगर-हवेली, दमण-दीव, गुजरात या ठिकाणी वारली संस्कृती प्रामुख्याने आढळते. आनंदाचे क्षण ते नृत्य करून साजरे करतात. जसे लग्न, उत्सव, घरप्रवेश, पुत्रजन्म, सुगीचे दिवस आदी प्रसंगी ‘तारपा नृत्य’ करतात. वारली चित्रांत तो अनेकदा असतो. हे नृत्य सकाळपासून सुरू होते ते रात्रभर चालते. हे नृत्य होत असताना घराच्या भिंतीवर चित्रनिर्मिती होत असते. लग्नाच्या वेळी ‘लग्नचौक’ आणि देवचौक लिहितात (म्हणजे रेखाटतात). त्यांच्या भाषेत ‘लिहिणे’ असे म्हणतात. चौकाच्या चार रेषा असतात. हिरोबा धनतरी, गवतरी आणि कन्सरी. हिरोबा-हिरव्या रंगाचा देव, धनतंरी-धरणी, गवतरी-गवतपाने, झाडेवेली. कन्सरी म्हणजे धान्याची देवी. चौक लिहिला की, त्याच्या गर्भात देवी काढतात. तिला पालघट म्हणतात. ती कुलदेवता असते. बाहेरच्या बाजूला चौक म्हणजे लग्नचौक असतो. त्याच्या शेजारी आयताकृती चौकोनात देवचौक लिहितात. हा लग्नचौकापेक्षा आकाराने लहान असतो. त्यात एक शिरा, तीन शिरा देवाची आकृती असते. अनुक्रमे एक शीर (डोके), तीन शीर असलेला देव असा अर्थ असतो. त्याच्या बाजूला वरातीचे दृश्य असते. चौक रंगवून झाल्यावर चादर किंवा कापडाने झाकून ठेवतात. पूजाविधी झाल्यावर तो दाखविण्यात येतो. हे चित्र काढणाऱया सुहासिनी स्त्राrला ‘धवलेरी’ असे म्हणतात. तिने काढलेल्या पहिल्या रेघेला ‘देवरेघ’ म्हणतात.

विवाह प्रसंगाच्या चित्राला देवचौक म्हणतात. चौकात एका घोडय़ावर बसलेल्या नवरा-नवरीच्या दोन मानवाकृती लिहितात. त्यासोबत करवली, प्रजननाची देवता फालगूट, वादक आणि नर्तक, सूर्यदेव, चंद्रदेव, बाशिंग, निसन यांचे चित्रण असते. फालगुट म्हणजेच ‘पालघाट’ हा शब्द गर्भाचे प्रतीक आहे. बाळाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी घराच्या भिंतीवर पाचवीचे चित्र लिहितात. त्यात तान्हे बाळ, सुईण, आई, विळा, सूप, बाळाची झोळी इ.चा समावेश असतो.

नागपंचमी, दसरा, दिवाळी इ. सणांना भिंती चित्रीत होतात. चित्र नसलेल्या भिंती नागडय़ा भिंती आहेत असे आदिवासी म्हणतात. त्यांच्या मते भिंतीवरील चित्रांमुळे भूतपिशाच्चांच्या त्रासापासून घर सुरक्षित राहते. चित्रात महादेव, पालघाट देव, महालक्ष्मीचा डोंगर, सूर्यदेव, चंद्रदेव, वाघदेव (वाघ) इ. चित्रण आढळते. प्रामुख्याने भातशेतीवर चित्रे असतात. भातशेतीचे विविध टप्पे, जसे पेरणी, कापणी, मळणी इ. चित्रे ही समृद्धतेची प्रतीके मानतात. वारली चित्र रंगविण्यापूर्वी गेरू आणि शेणाने भिंत रंगविली जाते. तांदूळ धुऊन थोडे वाळवून त्याचे पीठ करून त्यात थोडा गोंद घालून पांढरा रंग तयार केला जातो. बांबूची पोकळ काठी दाताने चावून कुंचला बनवितात. कधी कधी विशिष्ट गवताची काडी वापरतात. ही कला स्त्रियांनी जपली आहे.

1970 च्या सुमारास दिवंगत चित्रकार भास्कर कुलकर्णी यांनी भिंतीवरील चित्रे कागदावर लिहिण्यास प्रवृत्त केले. याच सुमारास दिवंगत वारली चित्रकार जिव्या सोमा म्हशे आणि त्यांचा सुपुत्र बाळू यांनी एक वेगळे वळण वारली कलेला दिले. परंपरागत सण-उत्सव कारणांखेरीज चित्रासाठी चित्र रंगविण्यास प्रारंभ केला. त्यामुळे जिव्या सोमा म्हशे (1934 ते 15 मे 2018) यांना 2021 मध्ये पद्मश्रीचा मान मिळाला. वारली चित्रकलेला शुद्ध कलेचा दर्जा मिळाला. म्हशे यांची मुले, नातवंडेही चित्रे काढतात. अनेक वारली चित्रकार आता प्रगतीपथावर आहेत. मधुकर वाडो या चित्रकाराच्या चित्रांचे जर्मन भाषेत संकलन होत आहे. रिना संपत उंबरसा, कुसूम सोमा खरपडे नवनवे प्रयोग करीत आहेत. केवळ दोन रंग न घेता अनेक रंग ते वापरतात. साडय़ा, कपडे यावर चित्रण करतात. युवा चित्रकारांच्या चित्रांत उंच इमारती, डबलडेकर बस, विमाने दिसू लागली आहेत. चौक लिहिण्याचा मान मात्र स्त्रियांचाच आहे. वास्तविक स्त्रियांनी जपलेली ही कला पुरुषांनी व्यवसाय म्हणून स्वीकारली आहे. परंपरागत विषयांबरोबर समकालीन विषयांवर चित्रण होत आहे. वारली समाजाखेरीज इतर व्यक्तींनीही वारली चित्रकलेसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

कर्नाटकमधील माणिक पब्लिक स्कूलच्या भिंतीवर 58 फूट ƒ 30 फूट एवढय़ा मोठय़ा आकारात अवंती कुलकर्णी या कला शिक्षिकेने वारली चित्र केले आहे. ‘वारली बोली व वारली लोकगीते’ या पुस्तकात दिवंगत प्रा. डा. ज. के. रानडे यांनी सुमारे दोन-अडीच हजार वारलींच्या सहवासात राहून जमविलेल्या लोकगीतांचा संग्रह आहे, तर डा. सुधाकर चव्हाण या चित्रकाराने ‘21 वे शतक आणि वारली कला’ या विषयावर प्रबंध सादर केला आहे. भारतीय टपाल खात्याने वारली चित्रकलेचे महत्त्व जाणून एक खास तिकीट काढले आहे.

डहाणूचे वारली चित्रकार हरेश्वर नथू वनगा यांनी वारली बोलीभाषेतील सुमारे पाच हजार शब्द, वारली जमातीच्या म्हणी, पारंपरिक गाणी, वाक्प्रचार, लोककथा यांचे संकलन केले आहे. चित्रकलेइतकीच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आजवर एकूण 13 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तलासरी आश्रमशाळेत त्यांनी लिहिलेली चित्रे पाहावयास मिळतात. वनगा यांनी 6 ƒ 5 फूट अशा आकारात चितारलेले वारली चित्रशैलीतील संपूर्ण रामायण राष्ट्रपती भवनात विराजमान झाले आहे. त्यात रामायणातील प्रत्येक अध्यायावर प्रसंग चित्रीत केलेले आहेत. लंकादहन, रावणवध, श्रीरामचंद्रांचे अयोध्येत पुनरागमन हे प्रसंग फारच सुंदर आहेत. आपल्या आई मधीबाई यांच्याकडून हा कलेचा वारसा त्यांच्याकडे आला. त्यांच्याकडून त्यांची कन्या चित्रगंधा सुतार हिच्याकडे आला आणि चित्रगंधाने जे.जे. स्कूल आाफ आर्टमधून चित्रकलेची पदवी घेऊन ती एका कला महाविद्यालयात अध्यापन करीत आहे.

अलीकडे नव्या चित्रकारांकडून परंपरागत चित्रातील काही आकार नावीन्याच्या नावाखाली बदलून चित्रीत केले जातात. वनगा यांची आदिवासींचे रीतिरिवाज, परंपरा, संस्कार यांचा अमूल्य ठेवा टिकून राहावा अशी तळमळ आहे. या साऱयांचे दस्तऐवजीकरण व्हावे यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

[email protected]
(लेखिका चित्रकर्ती, लोककला अभ्यासक व कलाशिक्षण तज्ञ आहेत)