वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात वादळाचे तांडव

वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तालुक्यात वादळीवाऱ्याने तांडव करीत थैमान घातले. तालुक्यातील नंदोरी, पाठर, जाम, बेलघाट, किन्हाळा, परडा परिसरात वादळाने धुमाकूळ माजवला. वादळाची तीव्रता एवढी होती की, अनेक घरावरील छपरे या वादळात उडाली. यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उडालेल्या छताचे पत्रे गाड्यांवर पडल्याने गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या वादळाच्या तडाख्यात शेकडो वीजतारांसह पोल जमिनीवर कोसळले असून परिसरातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला आहे. घरावरील छताचे पत्रे उडाल्याने छप्पप नसलेल्या घरात अनेक परिवार आपला जीव मुठीत घेऊन हा वादळाचा तांडव उघड्या डोळ्यांनी बघत होते.

सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाजताच्या सुमारास वादळाला सुरुवात झाली. यावेळी पाहता पाहता या वादळाने रौद्ररूप धारण केले. महामार्गावरील वाहतुकीवर देखील वादळाचा मोठा प्रभाव पडला असून या वादळामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

शेकडो विजेचे पोल व झाडे जमिनीवर कोसळले तर अनेक घराचे छत उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .तालुक्यातील विद्युत पुरवठा युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, या वादळाची माहिती मिळताच तहसिलदार कपिल हाटकर यांनी याची तत्काळ दखल घेऊन नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी तलाठी यांना नुकसानीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.