पुन्हा युद्धाचा भडका; हिजबुल्लाहने इस्रायलवर डागली 320 रॉकेट्स,11 लष्करी तळांवर हल्ला

हिजबुल्लाहने गेल्या महिन्यात इस्रायलव्याप्त गोलान हाइट्सवर हल्ला केल्यामुळे 12 जण ठार झाले होते. त्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात संघर्ष पेटला. गेले दोन दिवस इस्रायलने हिजबुल्लाहला लक्ष्य करत लेबॉननमधील अनेक भागांवर हल्ले केले. त्यानंतर हिजबुल्लाहनेही इस्रायलवर तब्बल 320 रॉकेट्स डागत 11 लष्करी तळांवर हल्ले केले. बैरुतमध्ये मारल्या गेलेल्या कमांडर फुआद शुकरच्या हत्येचा बदला घेतल्याची घोषणा हिजबुल्लाहने केली आहे.

दरम्यान, या हल्ल्यांमुळे इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष आणखी पेटणार असून युद्धाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अल जजीरा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार  हिजबुल्लाहने इस्रायलवर 320 क्षेपणास्त्रे आणि ड्रोनहल्ले केले. इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाहने आज 11 इस्रायली लष्करी तळांवर 320 कात्युशा रॉकेट्स डागल्याचे सांगितले. हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलांट यांनी आणीबाणी जाहीर केली. राजधानी तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळ बंद करून सर्व येणारी आणि जाणारी विमान उड्डाणे 90 मिनिटांसाठी थांबवण्यात आली. त्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. दरम्यान, इजिप्तमध्ये गाझात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी बैठक सुरू असताना दुसरीकडे लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पेटल्यामुळे मध्य आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

इस्रायलचा लेबनॉनवर हल्ल्याचा इशारा

इस्रायली लष्कराने सध्या लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागाला लक्ष्य केले आहे. परंतु, जर इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर लेबनॉनच्या इतर भागांवर हवाई हल्ला करण्याचा इशारा इस्रायलच्या लष्कराने दिला आहे.

नेतन्याहू काय म्हणाले?

आमच्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आमच्यावर हजारो रॉकेट्स डागण्यात आली; परंतु त्यांचे हल्ले आम्ही परतवून लावले. आम्ही उत्तरेकडील आमच्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याचा निर्धार केला आहे. जो आम्हाला डिवचतो, त्याला आम्ही धडा शिकवतो, हेच तत्त्व आम्ही आजवर पाळत आलो आहोत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.