वडाळय़ातील श्री गणेश विद्यालय परीक्षा केंद्र वगळा! युवासेनेची मागणी

दहावीच्या परीक्षेला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सोयीसुविधा नसलेले वडाळय़ातील श्री गणेश विद्यालय हे परीक्षा केंद्र वगळण्यात यावे, त्याऐवजी डॉन बॉस्को, ऑक्सीलियम आणि सेंट जोसेफ या शाळेतील विद्यार्थ्यांना सुसज्ज परीक्षा केंद्र द्यावे, अशी मागणी युवासेनेतर्फे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे करण्यात आली आहे.

डॉन बॉस्को, ऑक्सीलियम आणि सेंट जोसेफ या शाळेतील 190 विद्यार्थ्यांना मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेकरिता वडाळा येथील गणेश नगर झोपडी मंडळ संचालित श्री गणेश विद्यालय हे परीक्षा केंद्र आले होते. या केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. बसण्याचे बेंच लहान मुलांचे होते, हवा येण्यासाठी आजूबाजूला मोकळी जागा तसेच वर्गात पंखे नव्हते, शाळेच्या चारही बाजूंनी झोपडय़ांचा विळखा आहे. अशा वातावरणामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा न देण्याच्या मानसिकतेमध्ये होते. या गोष्टीची यंदा पुनरावृत्ती होऊ नये याकरिता या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिवसेनेकडे धाव घेतली.

पालकांच्या तक्रारींची दखल घेत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी महाराष्ट्र राज्य उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांची भेट न झाल्यामुळे चौरे यांची भेट घेतली. सदर परीक्षा केंद्राऐवजी या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र सुसज्ज शाळांमध्ये करण्यात यावे, अशी मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन असे केंद्र न देण्याचे आश्वासन युवासेनेला देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.