मुंबईसह महाराष्ट्रात हुकूमशाहीविरुद्ध मतदान

एक मत परिवर्तनासाठी… राज्यात 54.33 टक्के तर देशात 59 टक्के

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वांद्रे-कलानगर भागातील नवजीवन विद्यामंदिर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीही मतदान केले.

केंद्रातील मोदी सरकारच्या हुकूमशाही राजवटीविरोधात देशभरात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह राज्यात हुकूमशाहीविरोधात मोठय़ा संख्येने मतदारांनी आज घराबाहेर पडून परिवर्तनासाठी मतदान केले. अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी झाली होती. महाराष्ट्रातील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील 13 मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 54.33 टक्के मतदानाची नोंद झाली. देशातील 49 मतदारसंघांत सरासरी 59 टक्के मतदान झाले.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, दिंडोरी या 13 मतदारसंघांत सोमवारी मतदान पार पडले. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी होणाऱया मतदानासाठी मुंबई, ठाणे, नाशिकमधील मतदान केंद्रांवर हुकूमशाही सरकारविरोधात मतदान करून देशात परिवर्तन आणण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजून गेल्यावरही मतदान सुरू होते.

हुकूमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल! शिवसैनिक व महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचे आभार
मुंबई, ठाणे, कल्याणसह 13 ठिकाणी आज मतदान झाले. यावेळी मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होताच, शिवाय शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते परिणामांची पर्वा न करता झुंजले. ते पाहता देशातून हुकूमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.

मतदान केंद्रांवर मतदारांना झालेला त्रास आणि निवडणूक आयोगाच्या सावळय़ा गोंधळावर कडक आसूड ओढताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘एकीकडे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता, तर त्याचवेळी मतदान केंद्रांवर मात्र संथगतीने काम चालू होते. सरकारी यंत्रणा अशाप्रकारे अडथळे निर्माण करीत असताना शिवसैनिक मात्र नेटाने उभे ठाकले होते. युवा शिवसैनिकांसह जुन्या शिवसैनिकांची उपस्थितीही लक्षणीय होती. मी खासकरून कौतुक करेन ते महिला आघाडीच्या रणरागिणींचे. त्या या सर्वांसोबतच परिणामांची पर्वा न करता भिडल्या होत्या.’

यावेळी प्रसारमाध्यमांनीही चांगले सहकार्य केले यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून झुंजले. याचा विशेष उल्लेख करून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ तुम्ही सर्वांनीच हुकूमशाही गाडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. तुमची ही मेहनत नक्कीच फळास येईल. या सर्व शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना!’