बाप से बेटा सवाई! आर्यवीर सेहवागची बॅट तळपली; नेटकऱ्यांकडून कौतुकांचा वर्षाव…

टीम इंडियाला 2011 चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या वीरेंद्र सेहवागच्या धडाकेबाज फलंदाजीचे अनेक चाहते आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने जगातील अनेक प्रसिद्ध गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. पहिल्या चेंडूपासून आक्रमक आणि धडाकेबाज फलंदाजी करण्याच्या शैलीने सेहवागला खास बनवले. आता त्याची हीच धडाकेबाज फटकेबाजी पुढे नेण्याची जबाबदारी त्याचा मुलगा आर्यवीर सेहवाग पार पाडत आहे. आर्यवीरलाही क्रिकेट आवडते आणि वडिलांप्रमाणे तो दमदार फलंदाजीही करतो. दरम्यान अनेकदा आपण म्हणतो, ‘ बाप तसा बेटा,’ पण वीरेंद्र सेहवागच्या मुलाच्या बाबतीत बाप से बेटा सवाई असे चाहते म्हणत आहेत.

सोशल मीडियावर त्याच्या फलंदाजीचे अनेक व्हिडिओ आहेत. तो त्याच्या वडिलांसारखाच आक्रमकतेने खेळतो. त्याला फटकेबाज फलंदाजी करायला आवडते. बीसीसीआयने आयोजित केलेल्या अंडर-16 विजय मर्चंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. आर्यवीरने महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्याने वीरेंद्र सेहवागच्या शैलीत चौकार मारून डावाची सुरुवात केली. या सामन्यात तो 45 चेंडूंचा सामना करत केवळ 25 धावा करू शकला. मात्र त्याची ओळख संपूर्ण जगाला करून दिली.आर्यवीरचे आपल्या वडिलांप्रमाणे टीम इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आहे.

दरम्यान इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने टीम इंडिया संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेहवागने इंडियासाठी अनेक मॅच विनिंग इनिंग्सही खेळल्या आहेत. मात्र, त्याने इंडियाकडून शेवटचा सामना 2013 मध्ये खेळला होता. सध्या सेहवाग एका क्रिकेट तज्ज्ञांच्या भूमिकेत आहे.