कोहलीची आयसीसी क्रमवारीत झेप!

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतकी खेळी करणाऱ्या टीम इंडियाच्या विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या वन डे फलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेतलीय. शुभमन गिल अव्वल, तर कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. गोलंदाजी क्रमवारीत कुलदीप यादवनेही तिसरे स्थान राखण्यात यश मिळविले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. एकीकडे शुभमन गिलने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत पहिले स्थान गाठले होते, जे त्याने कायम ठेवत आपली आघाडी अधिक भक्कम केली. दुसरीकडे विराट कोहलीनेही सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने शानदार शतक झळकावले होते. त्याचा फायदा त्याला झालेला दिसून आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अजूनही तिसऱया क्रमांकावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला हेन्रीक क्लासेनब चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, हिंदुस्थानच्या विराट कोहलीने एका स्थानाने झेप घेतली आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला एका स्थानाचा धक्का बसला. तो आता 717 च्या रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर गेला आहे.